"पर्ससीन जाळ्याने मच्छीमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या समस्या दूर करा"

आमदार महेश बालदी यांनी घेतली केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची भेट

By Raigad Times    08-Aug-2022
Total Views |
fishing
पनवेल | पर्ससीन जाळ्याने मच्छीमारी करण्यासाठी शासनाने बंदी घातल्यामुळे मच्छीमारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मच्छिमारांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार महेश बालदी यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची 8 ऑगस्ट रोजी दिल्लीत भेट घेऊन पर्ससीन जाळ्याने मच्छीमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या समस्या मांडल्या आणि त्या अडचणी दूर करण्याची आग्रही मागणी केली.
 
 
पर्ससीन जाळ्याने मच्छीमारी करण्यासाठी शासनाने बंदी केल्याने मच्छिमार बांधवाना उदरनिर्वाह करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याबाबत राज्याच्या मागील विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार महेश बालदी यांनी आवाज उठवला होता.
 
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मोघम उत्तर देत वेळ मारून नेली होती. त्यामुळे आमदार महेश बालदी यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु केला. राज्यात जवळपास 30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेला कोळी समाज आपल्या उपजिविकेसाठी पारंपारिक मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहे.
 
पर्ससीन जाळ्याने मच्छीमारी करण्यासाठी शासनाने बंदी घातल्यामुळे कोळी समाजाला आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागल्याचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या निदर्शनास आणून दिले आणि मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी केली. त्यावर पुरुषोत्तम रुपाला यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या संदर्भात विशेष लक्ष देणार असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार महेश बालदी यांना आश्वासित केले.