गणेशाच्या आगमनाला खड्ड्यांचे विघ्न; मुरूड बाजारपेठ रस्त्याची झाली चाळण

By Raigad Times    08-Aug-2022
Total Views |
Murud
 
मुरुड | गणेश चतुर्थी अवघ्या 22 दिवसांवर येऊन ठेपली आहे. तरी मुरुड बाजारपेठेतील रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे गणेशाच्या आगमनाला खड्ड्यांचे विघ्न? असा प्रश्न सर्वसामान्य गणेश भक्तांना पडला आहे. तरी मुरुड नगरपरिषदेने जनाची नाही तर गणाची तरी भीती बाळगून रस्त्यावरील खड्डे बुजवून गणेशाचा मार्ग सुकर करावा, अशी तमाम मुरुडच्या गणेश भक्तांची आणि नागरिकांची मागणी आहे.
 
 
मुरूड नगरपरिषद ते एकदरा पुलापर्यंत असलेल्या बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.
 
याच महिन्यात 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थी हा कोकणातील सर्वात मोठा उत्सव या सणाच्या निमित्ताने मुंबईतून असंख्य चाकरमानी आपल्या गावाकडे परतत असतात. या येणाऱ्या गणेश भक्तांना या खड्ड्यातून प्रवास करावा लागणार आहे.
 
 
गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी आपापल्या घरी बाप्पा आणण्याची लगबग सुरू होते. त्यामुळे हे खड्डे लवकरात लवकर बुजवून गणेशाचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी सर्व स्तरावरुन जोर धरीत आहे. निदान जनाची नाही तर गणाची तरी भीती बाळगून मुरुड नगरपरिषदेने रस्त्यावरील खड्डे बुजवून गणेश भक्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.