पनवेल: कळंबोलीमधील पे अँड पार्क बनले मद्यपींचा अड्डा

By Raigad Times    06-Aug-2022
Total Views |
alcohol
 
पनवेल | सिडको आणि महानगरपालिका या दोन्ही आस्थापनामध्ये सिडको वसाहतीतील जनता भरडली जात आहे. कळंबोली सेक्टर 2 आणि सेक्टर 6 मधील उद्याने डंपिंग ग्राउंड बनली आहेत. मागिल काही दिवसापासून कचरा उचलला गेल्या नसल्याने नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. तेव्हा तो कचरा ताबडतोब उचलण्यात यावा आणि मद्यपीची बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
 
कळंबोली सेक्टर 2 मधील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले पे अँड पार्क उद्यान कळंबोलीची शान वाढवत होते. त्याच्या संरक्षण भिंती गायब आहेत. ते आज लोप पावत आहे. तर साईनगर वसाहती जवळ सिडकोचे उद्यान असून हे शहरातील महत्वाचे उद्यान आहे. याला लागूनच नाला गेला असून तो सिडकोकडून एक दोन वर्ष साफ केला गेला नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. तो नाला पनवेल महानगर पालिकेकडून साफ करण्यात आला पण त्यातील घाण उद्यानात टाकण्यात आल्याने त्याचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे. मात्र सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतर आणि येथे सुरक्षा रक्षक नसल्याने या उद्यानाचे सौंदर्य लयास गेलेले आहे.
 
आजमितीस ते उद्यान गर्दुल, मद्यपी, जुगारी आणि भिकारींचे ठिकाण बनले आहे. सेक्टर 6 मधील उद्यानाना काही महिन्यांपूर्वी संरक्षक लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या होत्या पण ते काम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्या जाळ्या तुटुन गेल्या आहेत. त्यामुळे उद्यान लोप पावत चालले आहे. या संपूर्ण उद्यानात गटुळे आणि मद्यपींचा दररोज अड्डा जमतो त्यामुळे या ठिकाणी मद्याच्या बाटल्या इतस्ततः विखुरलेल्या दिसून येतात. परिणामी हे उद्यान महिला वर्गाला आणि ज्येष्ठ नागरिकांना असुरक्षित बनले आहे.
 
सेक्टर 2 मध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीवर कार्यरत असलेल्या कामगारांसाठी सोयी सुविधा देताना सिडकोने शौचालय उभारण्यात आले आहे. त्याची निगा राखली जात नसल्याने त्यात किडे पडले आहेत. येथे कायमच दुर्गंधी असते, त्यामुळे कामगारांना नाईलाजास्तव त्याचाच वापर करावा लागतो. पण त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.