रायगडातील वंचित महिला परिचारिकांनी घेतला आंदोलनाचा पवित्रा

जिल्हा परिषद कार्यालयासमोर 23 ऑगस्टला धरणे आंदोलन

By Raigad Times    13-Aug-2022
Total Views |
 female nurses
अलिबाग | रायगड जिल्ह्यातील सुमारे साडेतीनशे अर्धवेळ महिला परिचारिका यांनी त्यांच्या विविध अडचणी आणि मागण्या याबाबत वेळोवेळी मागणी करून देखील जिल्हा प्रशासन महिला परिचारिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेरीस 23 ऑगस्ट 2022 रोजी सर्व महिला परिचारिकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा हाती घेतला आहे. 
 
रायगड जिल्ह्यातील अर्धवेळ महिला परिचारिका यांनी त्यांच्या विविध मागण्या आणि अडचणी अनेक वेळा जिल्हा प्रशासनाकडे मागणी करून देखील जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, जिल्ह्यामध्ये सर्वात तळातील कर्मचारी असलेल्या आणि खेड्यापाड्यातून कोणतेही सुविधा नसताना तुटपुंज्या मानधनावर आरोग्य विभागातील नेमून दिलेले काम तसेच रुग्णसेवा सदर महिला परिचारिका भगिनी करीत आहेत हे पद फार जुने असून फक्त रुपये तीस मानधनापासून ह्या महिला परिचारिका कार्यरत आहेत.
 
मात्र अनेक वेळा त्यांच्या समस्या मांडून देखील जिल्हा प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्ह्यातील महिला परिचारिका यांनी 23 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे निश्चित केले असून याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी त्याचप्रमाणे इतर अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे.
 
या निवेदनामध्ये महिला परिचर यांच्या प्रमुख मागण्या अधोरेखित केल्या आहेत. यामध्ये महिन्याच्या महिन्याला वेळेत मानधन मिळत नाही, प्रत्येक महिन्याला तालुकास्तरावर तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे खेटे मारावे लागत आहेत, अनेक वेळा फोन केल्यानंतर किंवा फेऱ्या मारल्यानंतर आम्हाला पाच ते सहा महिन्यानंतर मानधन दिले जाते. ते सुद्धा पूर्ण मिळत नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे, त्यामुळे प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पूर्ण मानधन मिळावे अशी प्रमुख मागणी महिला परिचारिका यांची आहे.
 
त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये ग्रामपंचायत स्तरावरील महिला परिचारिका यांना प्रोत्साहन पर भत्ता मिळावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे. सदरचा भत्ता हा जिल्हा परिषद सेस फंडामधून देण्यात यावा, अशी मागणी यामध्ये नमूद करण्यात आली आहे.
 
तसेच गणवेश, छत्री, टॉर्च, बूट इत्यादी साहित्याचा पुरवठा देखील महिला परिचारिका यांना करण्यासाठी निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
 
सदरचे निवेदन जिल्हा महिला परिचर महासंघ यांच्या वतीने महासंघाच्या जिल्हाध्यक्षा ललिता दिवेकर, उपाध्यक्ष रेश्मा ठाकूर, सचिव प्रणाली मोहिते आणि इतर सदस्य यांनी दिले.
 
"आमच्या महिला भगिनी आरोग्य सेवेमध्ये 1960 साला पासून परिचर पदावर काम करीत आहेत परंतु शासनाने परिचर भगिनींच्या मागण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. इतर जिल्ह्यामध्ये महिला परिचरांच्या मागण्या याआधीच पूर्ण झालेल्या असताना रायगड जिल्हा परिषदेने आमच्या वंचीत भगिनींच्या मागण्या पूर्ण कराव्यात."
-ललिता दिवेकर, अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद परिचर महासंघ