बाप्पाच्या आगमनासाठी पनवेलमधील बाजरपेठा सज्ज; सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी भक्तांची लगबग

12 Aug 2022 16:35:52
ganeshotsav
 
पनवेल | गणेशाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असून शहरवासीय उत्सवाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत. बाजारपेठाही फुलल्या आहेत. आपल्या घराचा गणेशा सर्वात वेगळा दिसावा यासाठी लोकांची, बाजारपेठेत गर्दी दिसू लागली आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सजावटीचे साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.
 
 
गणेशउत्सव काळात मोठ्या प्रमाणात घरगुती आणि सार्वजनिक मंडळामध्ये आरास करण्यासाठी विविध प्रकारचे डेकोरेशन, फुले, विजेचे तोरणे आदींचा वापर केला जातो. त्याच्या खरेदीसाठी आता लगबग सुरु झाली आहे.
 
पर्यावरणापूरक मूर्तीना भक्तांची पंसती
 
यंदा जय मल्हार, पांडुरंगाच्या अवतारातील, लालबागचा राजा, शिवाजी महाराज, दगडूशेठ, श्री कृष्ण अवतारातील गणेशमूर्तीना मोठ्या प्रामणात मागणी आहे. तसेच शाडूपासून बनवलेल्या मूर्ती तसेच कागदापासून तयार केलेल्या बाप्पाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील वर्षाच्या तुलनेने इकोफ्रेंडली मूर्तीची मागणी वीस टक्क्यांनी वाढली आहे. यंदा पीओपीच्या मूर्तीची बंदी नसल्यामुळे त्या घेण्याकडे देखील कल आहे. मात्र पुढच्या वर्षापासून पीओपीच्या मूर्ती बाजारात दिसणार नाहीत.
 
ढोल पथकांचा सराव
नियमांचे पालन करून शहरातील ढोलपथके सराव करत आहेत. काही ठिकाणी नागरिकांच्या रोषापायी या पथकांना सराव करण्यास अडथळा आल्याने त्यांना शहराच्या कोपऱ्यात सराव करावा लागत आहे.
 
पुठ्यांच्या मखरांना मागणी
प्रदूषणाचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत असताना पनवेल परिसरात इकोफ्रेंडली मखरांचा प्रभाव दिसून येत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यासाठी पुठ्यांपासून तयार केलेल्या मखरांना सर्वाधिक मागणी आहे. कागदाच्या लगद्याने आणि जाठ पुठयांनी तयार केलेल्या मखर बाजारात आहेत. थर्मालकॉलच्या मखरांना पर्याय म्हणून सदर मखर सुरुवातील बाजारात आली होती. पण आता पर्यावरण सक्षम हेच यामागे मुख्य ध्येय आहे. पुठ्यांच्या या मखंरामध्ये विविध प्रकार आहेत. या मखरांच्या किमती 1500 पासून 6500 रुपयांपर्यंत आहेत.
 
गणेशभक्तांना आवाहन
गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर होणारे पाण्याचे प्रदूषण, पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, शाळा, महविद्यालयातील विद्यार्थी तसेच मूर्तिकार जनजागृती करत आहेत. शहरात होणाऱ्या जनजागृतीच्या माध्यमातून पर्यावरणाचा हास थांबवण्यासाठी इकोफ्रेंडली मूर्तीचा वापर करावा, असे आवाहन भाविकांना करण्यात येत आहे. विसर्जनाच्या वेळी मूर्तीच्या अंगावरील दागिने, निर्माल्य अशा पाणी दूषित करणाऱ्या सर्वच वस्तू वेगळ्या काढून फक्त मूर्तीचे विसर्जन करावे, अशी माहिती मूर्तिकार भक्तांना देत आहेत.
Powered By Sangraha 9.0