पालीत अनोख्या चॉकलेट राखीची क्रेझ

सणाच्या आनंदाबरोबर होणार तोंडही गोड

By Raigad Times    10-Aug-2022
Total Views |
rakhi
पाली/बेणसे | रक्षाबंधनानिमित्त जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. लहानग्यांना राख्यांचे अधिक आकर्षण असते. त्यामुळे विविध कार्टून असलेल्या राख्यांना अधिक पसंती दिसते. मात्र सध्या चॉकलेट राखीची लहानग्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. पर्यावरण स्नेही, स्वस्त आणि उपयुक्त अशा विविध आकाराच्या चॉकलेट राख्यांची मागणी वाढली आहे.
 
 
पालीतील चॉकलेट राख्या निर्मात्या निवेदिता भावे यांनी सांगितले की, चॉकलेट लहान मुलांमध्ये प्रिय आहे. चॉकलेट राखी हातावर बांधून वरचे चॉकलेट काढून खाता येते. खाली असलेली रंगेबिरंगी रीबीन हातालाच राहते. म्हणजे राखी हातालाच राहते. प्लास्टिकच्या राख्यांपेक्षा कचरा कमी होतो. उत्तम दर्जाचे चॉकलेट वापरले जाते आणि ते तब्बल 20 दिवस टिकते. नेहमीच्या राख्यांपेक्षा काहीतरी वेगळ्या सेलिब्रेशनचा आनंद मिळतो. आणि बच्चेकंपनी देखील खुश होते. या राख्या साधारण 25 ते 30 रुपयांना मिळतात. त्यामुळे इतर राख्यांच्या तुलनेत त्या खूप स्वस्त आहेत. अनेकांनी आगाऊ बुकिंग केली असल्याचे निवेदिता यांनी सांगितले.
 
विविध आकार, नक्षीकाम, रंग आणि ड्रायफ्रूट
 
चॉकलेट राख्या गोल, त्रिकोणी, चौकोनी अशा वेगवेगळ्या आकारांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच चॉकलेटी, गडद काळे, चंदेरी आणि सोनेरी अशा रंगांमध्ये आणि नक्षीकाम असलेले आहेत. याबरोबरच चॉकलेट वर काजू, बदाम, पिस्ता असे वेगवेगळे ड्रायफूट लावलेल्या राख्या सुद्धा आहेत. त्यामुळे या राख्या चवी बरोबरच आरोग्यदायी सुद्धा आहेत. राखीचा बँड मखमली कापडाचा आणि विविध आकर्षक रंगाचा असल्यामुळे लहानग्यांना खूप आवडतो.
 
"माझ्या अडीच वर्षाच्या छोट्या भावाला चॉकलेट राखी बांधणार आहे. मला ही राखी खूप आवडली. तसेच मी स्वतःला देखील चॉकलेट राखी घेणार आहे. कारण मला चॉकलेट आवडते."
-श्रेया सावंत, इयत्ता दुसरी