म्हसळ्यात गेल्या आठवड्याभरात ६११ मि.मी. पावसाची नोंद

पावसामुळे बळीराजा गुंतला शेतात मात्र बाजारात मंदीचे सावट

By Raigad Times    09-Jul-2022
Total Views |
mhasala
म्हसळा । म्हसळा तालुक्यात आज पर्यंत १०९४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चालू खरीपाच्या हंगामात पाऊस उशीरा सुरू झाला आसला तरी त्यानी मागील वर्षाची सरासरी गाठली आहे. गेल्या आठवड्यात ६११ मि.मि.पावसामुळे खरीप पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. नद्या, ओढे, नाले पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पाऊस आधूम-मधून उघाडी देत असल्यामुळे बळीराजा लावणीच्या, तालुक्यातील फळबागायतदार आंबा-काजूच्या आणि अन्य बागायतींच्या मशागतीच्या कामात गुंतला आहे.
 
तालुक्यात भात २४०० हेक्टर, नागली ४०० हेक्टर, वरीचे १०० हेक्टर क्षेत्रांत पिक घेतले जाते. तर फळबागायतीमध्ये आंबा २४०० हे, काजू ७०० हे, सुपारी ६० हेक्टर क्षेत्रात पिक घेतले जाते. भात शेतींत घरा-घरांतील सर्व मंडळी लावणीच्या कामात गुंतली आहेत. आंबा फळबागायतींना रिंगा काढून खत देण्याचे मशागतीचे काम सुरू झाले आहे. सुपारीचे पिकाला फवारणीचा कालावधी सुरु आहे. तालुक्यातील सर्व क्षेत्रांतील शेतकरी, फळबागायतदार, शेतमजूर शेतात गुंतल्यामुळे बाजारांतील ग्राहकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात मंदीचे सावट आल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
 
"तालुक्यांत जंगली श्वापद, माकड, वानर, केलटी यांचा प्रार्दुभाव, मजुरांची कमतरता यामुळे वनक्षेत्रांजवळील आणि अन्य भातशेती आर्थिक दृष्ट्या नुकसानीची होत आसल्याने शेत जमीन मोठ्या प्रमाणावर पडीक सोडण्याकडे शेतकरी वर्गाचा कल आहे. कृषी आणि महसुल विभागाच्या माध्यमांतून पिकाखाली क्षेत्राचे सर्वेक्षण व्हावे."
-मधुकर बाळाराम पाटील, मेंदडी
 
"शेती करताना सर्व मजूर विकत घेऊन शेती करायची झाल्यास खुल्या बाजारापेक्षा मजुर घेऊन पिकविलेले तांदूळ महाग पडतात. आज ग्रामिण भागांत नांगर ६०० ते ७०० रुपये, स्त्रियांची (मजूर) २०० ते २५० मजूरी, पुरुषांची ४०० ते ५०० मजूरी आसल्याने शेती परवडत नाही."
-दक्षता दिनेश घोले, शेतकरी घूम ता.म्हसळा