पेणमध्ये "बंटी बबली"चा धुमाकूळ; प्रवीणा सावंत आणि साथीदाराला पेण पोलिसांकडून अटक

08 Jul 2022 17:09:11
pravina sawant
पेण । जेएसडब्ल्यू कंपनीत नोकरी लावते तसेच या कंपनीत ठेका मिळवून देण्याचा बहाणा करुन ३१ लाख ७९ हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी पेण येथील राजकीय पक्षाची महिला नेता प्रविणा सावंत आणि तिचा पेणचा साथीदार अतुल मांडवकर याला पेण पोलिसांनी अटक केली आहे.
 
 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी अजय पाटील रा.लाईन आळी, पनवेल यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीत स्क्रॅपचे कंत्राट मिळवून देते असे सांगून पेण येथील आरोपी प्रविणा सावंत ( रा.गुरुकृपा सेासायटी,पेण) तसेच तिचा साथीदार अतुल मांडवकर यांनी पहिले दोन लाख रुपये उकळले आणि विश्वास संपादन केला. तसेच त्यानंतर जेएसडब्ल्यू कंपनीत एच.आर. विभागातील अधिकारी अर्जुन कामत हे माझ्या खास परिचयाचे असल्याचे सांगून सदर कंपनीत सिक्युरिटी पदासाठी ३० ते ५० हजार, क्लेअरीकल पदासाठी ६० हजार आणि त्यावरील पदासाठी १ लाख ते १ लाख २० हजार रुपये घेऊन फक्त १० ते २० दिवसात नोकरीला लावते, असे सांगून आर्थिक फसवणूक केली आहे.
 
या बंटी आणि बबलीने आत्तापर्यंत धुमाकूळ घालत तक्रार दिलेल्या ४३ तरुणांकडून २० जानेवारी २०२२ ते ८ मे २०२२ या कालावधीत ३१ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. प्रत्येकी ३० हजार ते १ लाख २० हजार असे एकूण २९ लाख ७९ हजार रुपये तसेच फिर्यादी यांना जेएसडब्ल्यू कंपनीत स्क्रॅपचा ठेका मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपये असे एकूण ३१ लाख ७९ हजार रुपये घेऊन फिर्यादी यांना कोणतेही कंत्राट आणि नोकरी दिली नाही.
 
 
पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, सदर आरोपी प्रवीणा सावंत ही तिचा साथीदार अतुल मांडवकर यास जेएसडब्ल्यू कंपनीचा एच.आर.विभागातील अधिकारी म्हणून सांगत असत, आणि ज्या तरुणांना कंपनीच्या अधिकाऱ्याला भेटायचे असेल त्यावेळी आरोपी अतुल यास कंपनीच्या गेटवर उभा करून फसवत असेल. मात्र अनेक महिने नोकरी आणि ठेका मिळत नसल्याने सदर फिर्यादीने पेण पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
 
 
त्यामुळे पेण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर तरुणांना नोकरी आणि ठेका न देता आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी पेण पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १५४ /२०२२ भा.दं.वि.क. ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि पी.टी.काळे हे अधिक तपास करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0