रोहा तालुक्यात धुवाधार पाऊस .. १९७ मि.मी. पावसाची नोंद

जुन्या पुलावरून पाणि वाहू लागले; कुंडलिका नदिने केले रौद्र रूप धारण!

By Raigad Times    07-Jul-2022
Total Views |
roha
 
 
रोहा । रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून रोह्याची कुंडलिका नदीने गेल्या चार दिवसांत पाचवेळा इशारा पातळी ओलांडली आहे. रोहा तालुक्यात १९७ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. कुंडलिका नदिने रौद्र रूप धारण केले असून जुन्या पुलावरून पाणि वाहू लागले आहे.
 
रोह्यात गेली चार दिवस धुवाधार पडणाऱ्या पावसाने आज गुरूवारी ही हैदोस घातले आहे. शहरातील मुख्य हमरस्त्यावर ठिक ठिकाणी पाणी साचलेले, पीडबल्यूडी कार्यालयात आणि रोहा अष्टमीतील सखल भागात पाणी शिरले होते. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून भिरा व कोलाड येथिल डोलवहाल धरणातून पाणि सोडण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
 
दुपारी रोहा अष्टमी पुलावरून पाणी वाहूं लागले. पाऊसाची स्थिति अशीच राहिल्यास किनाऱ्यावरील गावात पाणि शिरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. धरणातून पाणी सोडले गेल्यास त्याचा फटका नदीच्या दोन्ही बाजू कडील रोहा अष्टमी शहर आणि नजीकच्या गवांना बसणार आहे. तसेच धाटाव एमआयडीसीत कामासाठी मोठया संख्येने येणाऱ्या कामगार वर्गालाही बसणार आहे.
 
रोहा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असुन नदी, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. या पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. पाण्याची वाढत असलेली पातळी लक्षात घेता तालुका प्रशासनाकडून नदी किनारी असणाऱ्या गावांना सतर्केचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे काही भागातील भातशेती पाण्याखाली गेली असल्याने शेतकरी चिंतित झाला आहे. शेतीच्या बांधाना खांडी गेल्याने पावसाचे पुराचे पाणी शेतात शिरत आहे.
 
नद्यानीं धोक्याची पातळी ओलांडली
मुसळधार पडत असणाऱ्या या पावसामुळे तालुक्यातील कुंडलिका, गंगा, मैसदरा या नद्या इशारा व धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. परिणामी नदी किनारील काही गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. कुंडलिका तुडूंब भरुन वाहत असल्याने दमखाडी मागिल बाजूस तसेच अष्टमी नाका येथे नदीचे पाणी शिरले आहे.
 
"रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आले असून अतिवृष्टिचा ईशारा देण्यात आला आहे, प्रशासन पूर्णतः दक्ष असून महसूल विभागासह पूर नियंत्रण कक्ष सर्वत्र संपर्क ठेवून आहे. मागील पुराचा अनुभव पाहून प्रत्येक ठिकाणी सहायता गट कार्यरत आहेत. तसेत शासनाचे सर्व विभाग संयुक्तपणे काम करत आहेत."
-कविता जाधव, तहसीलदार, रोहा