जांभुळपाडा 1989 चा महापूर ...त्या काळरात्रीला झाली 33 वर्षे पूर्ण

25 Jul 2022 16:49:20
jambhulpada
 
 
सुधागड/पाली | अंबा नदीला 24 जुलै 1989 च्या पहाटे महापूर आला होता. या महापुराचा फटका सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा गावाला बसला होता. या महापुराला 24 जुलै 2022 रोजी 33 वर्षे पूर्ण झाली आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील येथील स्मृती स्तंभाजवळ सर्व ग्रामस्थ आणि मान्यवरांनी महापुरातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि त्या दुःखद आठवणींना उजाळा दिला.
 
 
1989 च्या महापुरात अनेकांनी आपल्या जिव्हाळ्याची माणसे गमावली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. याबाबत दुःखद आठवणी सांगतांना शिक्षक जे.बी. पाटील म्हणाले की, 23 जुलै 1989 ची रात्र जांभूळपाडा गावाच्या दृष्टीने काळरात्र ठरली. सगळीकडे सुन्न आणि भयावह वातावरण होते.
 
 
दुर्दैवाचे दशावतार आणि आभाळ फाटणे काय असते याचा खराखुरा प्रत्यय या पुराने आम्हाला दिला, असे जे.बी.पाटील यांनी सांगितले.पाटील गहिवरुन म्हणाले त्या काळरात्रीने माझी कारभारीन हिरावून नेली. 23 तारखेला संध्याकाळी मुंबई वरुन बायकोच्या माहेरुन सर्वजन घरी आलो. नदीला तसे पाणी जास्त नव्हते. रात्री अडिच वाजता ऊठुन बघतो तर काय सर्व घरात पाच फुट पाणी. आई, भाची (पाचवीत), मुलगा (अडिच वर्षाचा) आणि बायको सगळे गोंधळुन गेलो. बघता बघता पाणी आठ नऊ फुट वाढले. बायकोचा हात हातातुन निसटाला आणि ती डोळ्यासमोरुन वाहुन गेली, मुलगा आणि मी वाहत जात एका झाडाला अडकलो. दुसर्‍या दिवशी गावातील बबन घरत आणि गावकर्‍यांनी झाडावरुन काढले. आई भाची आणि बायको गेलेत या विचारातच घराकडे धाव घेतले तर आई आणि भाची स्वयंपाक खोलीच्या ओट्याच्या खिडकीला टांगुन राहिल्या म्हणुन वाचल्या. पण कारभारीण मात्र गेली. आणि तीच्या बरोबर पोटातील आठ महिण्याचे बाळ देखील. सरकार दरबारी मृतांचा आकडा 80 असला तरी वास्तवात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला. या पुराचा फटका पाली आणि इतर गावांना देखील बसला होता.
 
 
यावेळी इतर उपस्थितांनी देखील आपले अनुभव सांगून माहिती दिली.
यावेळी सरपंच श्रध्दा कानडे, पोलीस उपनिरीक्षक सरगर, रवींद्र खंडागळे, भास्कर, शेळके, जे.बी.पाटील, रोहीत भगत, सहाय्यक फौजदार म्हात्रे, पोलीस नाईक भोईर, पोलीस नाईक गणेश डोंगरे, पोलीस शिपाई रामसेवक कांदे, पोलीस शिपाई अलगर आंबा बहाडकर, जांभुळपाडा मंडळ अधिकारी बुरंबे, ग्रामसेवक सचिन केंद्रे, प्रतिभा कुलकर्णी, नितीन काळे, ज्ञानेश्वर कदम, नंदा भगत आदींसह ग्रामस्थांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली.
Powered By Sangraha 9.0