पोलादपूरच्या कशेडी घाटात ट्रेलरची डंपरला धडक; अपघातात चार जखमी, वाहनांचे प्रचंड नुकसान

By Raigad Times    19-Jul-2022
Total Views |
Accident
 
 
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील चोळई गावातील अपघातांची मालिका चौपदरीकरणानंतरही अद्याप थांबलेली दिसून येत नाही. सोमवारी दुपारी पोकलॅण्ड मशीन घेऊन जाणाऱ्या ट्रेलरची डंपरला धडक बसल्याने झालेल्या अपघातामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.
 
सोमवारी 18 जुलै रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास खेडकडून मुंबईच्या दिशेने ट्रेलर (क्रमांक आरजे 01 जीसी 3209) मधून पोकलॅण्ड मशीन (क्रमांक आरजे 14 जीई 3819) घेऊन तीव्र वळण उतारावरून वेगाने येत असताना चालकाचा ताबा सुटून ट्रेलर आणि पोकलॅण्ड मशीनसह पोलादपूरकडून धामणदिवीच्या दिशेने जाणाऱ्या डंपरला समोरासमोर रस्त्याच्या मधोमध धडक बसली.
 
यामुळे डंपर आणि ट्रेलर ही दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यावेळी ट्रेलरमधील हिरालाल राधाकिशन चौधरी (वय 16 वर्षे) आणि प्रधान रामकिशन चौधरी (वय 23 वर्षे), दोघेही रा.समोद, ता.नसेराबाद, जि.अजमेर, राजस्थान तसेच डंपरमधील शंकर काशिनाथ पवार (वय 40 वर्षे, जोगेश्वरी गाडीतळ, पोलादपूर) आणि तुषार नीळकंठ सावंत (वय 36 वर्षे, सह्याद्रीनगर, पोलादपूर) असे चौघेजण जखमी झाले. यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष अजय सलागरे तसेच अन्य प्रवाशांनी घटनास्थळावरून जखमींना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले.
 
याप्रकरणी गुन्हा.र.नं. 59-2022 नुसार ट्रेलरचा चालक प्रधान रामकिशन चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक फौजदार व्हि.जी.चव्हाण हे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.