कर्जतच्या रेल्वे पट्ट्यातील पाली-भूतीवली धरण ओव्हरफ्लो

By Raigad Times    18-Jul-2022
Total Views |
 karjat
 
कर्जत | कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाटबंधारे विभागाने बांधलेले पाली भूतीवली लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरून गेला आहे. धरणाचे कालवे पूर्ण नसल्याने धरणाचे पाणी शेतीसाठी सोडले जात नाही. गेली काही दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे पट्ट्यातील हे धरण ओसांडून वाहू लागले असून दरवर्षी हे धरण जुलै महिन्यात पूर्ण भरून वाहू लागते. दरम्यान, वर्षा सहलीसाठी प्रसिद्ध असलेल्या कर्जत तालुक्यातील या धरणावर मात्र पर्यटकांना 100% बंदी आहे.
 
 
नेरळ-कर्जत रस्त्याच्या भिवपुरी रोड गावाच्या समोर पाली भूतीवली धरण असून 2003 मध्ये या धरणाचा मुख्य बांध घातला गेल्यानंतर पावसाळ्यात जलाशयात पाण्याचा साठा झाला होता. त्यावेळी आणि आजपर्यंत धरणाचे पाणी परिसरात असलेल्या 1100 हेक्टर शेतीला सोडण्यासाठी कालवे बांधण्याचे पाटबंधारे विभागाकडून खोदण्यात आले नाहीत. त्यामुळे धरणाचे पाणी आजतागत शेतीसाठी देण्यात आले नाही. परिणामी ते पाणी आजही तसेच पडून असते. धरणातील साठून असलेल्या पाणी मोठ्या प्रमाणात तसेच राहत असल्याने 35 दशलक्ष घनमीटर क्षमता असलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक राहते.
 
 
त्यामुळे या वर्षी पावसाने उशिरा जरी सुरुवात केली असली तरी अवघ्या दहा दिवसांत धरणाच्या जलाशयाने आपली पातळी गाठली असताना धरण ओव्हरफ्लो झाले. तो अनुभव धरणाच्या खाली असलेल्या आसल, भूतीवली या गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी अनुभवला. धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहून जाण्याचा पहिला अनुभव तेथे पाहण्यासाठी असंख्य लोक जमले होते आणि त्यांनी आपण पहिल्यांदा असा धरण भरून वाहताना अनुभव घेतला. त्यावेळी फेसाळते पाणी पाहून त्यात भिजण्याचा अनेकांना उत्साह दिसून आला. मात्र धरणातील मासे धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर खाली पाण्यासोबत जात असतात आणि ते मासे पकडण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ जमले होते.
 
 
ज्या सांडव्यातून पाणी आज सकाळी खाली कोसळले त्या सांडव्याचे काम पूर्ण झाले नाही. परिणामी त्या सांडव्याखाली असलेल्या पायऱ्यांवर बसून अनुभवण्यासाठी पर्यटकांना बंदी आहे. कारण ते काम अपूर्ण असल्याने त्या ठिकाणी पर्यटक आणि वर्षासहल प्रेमींनी बंदी आहे. कारण धरणाच्या जलाशयात आजपर्यंत किमान बाहेरून फिरण्यासाठी आलेल्या किमान 15 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे धरणाच्या परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्यांना बंदी घातली आहे. पाटबंधारे विभागाने आणि नेरळ पोलीस दलाने या ठिकाणी पर्यटनासाठी जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.