उरणकरांना लावला चूना; पेट्रोल पंपातुन पेट्रोल ऐवजी आले पाणी, वाहनचालकांमध्ये संताप

By Raigad Times    15-Jul-2022
Total Views |
petrol pamp
 
उरण | उरण तालुक्यातील बोकडविरा गावाजवळ असलेल्या इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल ऐवजी पाणी भरले जात असल्याचे वाहनचालकांच्या दक्षतेमुळे उघड झाले आहे. याबाबत वाहनचालकांनी पेट्रोल पंपावर जाब विचारला असता पंप मॅनेजर काही बोलण्यास तयार नसल्याचे दिसले. याबाबतचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हाट्सअॅपच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. त्यामुळे सदर पेट्रोल पंपावर काय कारवाई होते याकडे वाहन चालकांचे लक्ष लागून राहिले आहे.
 
सदर प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे तेथे काम करणाऱ्या काही कामगारांनी पंप मॅनेजरला सांगितले होते, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे समजते. उरण परिसरातील अनेक पेट्रोल पंपावर पावसाळ्यात पाणी मिश्रीत पेट्रोलची विक्री होत असल्याचा अनुभव उरणकरांना दरवर्षी येतो. यावर्षी ही बोकडविरा गावाजवळील केअर पॉईंट हॉस्पिटल जवळ असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर गेले काही दिवसांपासून पाणी मिश्रीत पेट्रोलची विक्री केली जात आहे. या गोष्टीचा काही वाहनचालकांना अनुभव आल्यानंतर त्यांनी तक्रार केली असता त्यांचे पैसे परत देण्यात आले असल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते.
 
 
पाणी मिश्रीत पेट्रोलची विक्री करीत असतानाही याची कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. तसेच पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सदर गोष्ट निदर्शनास आणून दिली होती. परंतु याकडे पेट्रोल पंपच्या मॅनेजरने दुर्लक्ष केल्याचे समजते. तरी ही गेले काही १५ ते २० दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे बोलले जाते असले तरी पेट्रोल पंप मालकांनी पाणी मिश्रीत पेट्रोल विकून लाखो रुपये कमविले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्यानी तक्रार केली त्यांना त्यांचे पैसे परत देऊन बोलती बंद केली. मात्र आज काही वाहनचालकांनी आवाज उठवीत भरलेल्या वाहनातून पेट्रोल ऐवजी पाणीच बाहेर आले. त्यानंतर पेट्रोल पंपच्या पाईपलाईन मधून पेट्रोल भरण्यास सुरुवात केली असता पेट्रोल ऐवजी पाणीच पाणी येत असल्याचे दिसले. यानंतर आक्रमत होत वाहनचालकांनी हा प्रकार व्हाट्सअॅपच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल करत पेट्रोल पंपाचे पितळ उघडे पाडले.
 
 
यानंतरही पेट्रोल पंप मॅनेजरने आपली जबाबदारी झटकत हा प्रकार आपल्याला आताच माहिती पडला असून त्यावर लवकरच उपाययोजना करू असे सांगत वेळ मारून नेली. परंतु गेले काही दिवस हा प्रकार घडत असेलतर यातून लाखोंचा मलिंदा लाटला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांकडून जोर धरू लागली आहे.