पाली सब पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी

अपुरे कर्मचारी आणि सुविधांच्या अभावाने नागरिकांची गैरसोय

By Raigad Times    11-Jul-2022
Total Views |

pali post office
 
पाली/बेणसे | रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण पाली आहे. मात्र येथील सब पोस्ट ऑफिसमध्ये (उप डाक घर) 1 पोस्ट मास्टर आणि 4 क्लार्क अशा पाच जागा रिक्त आहेत. परिणामी उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. तसेच लवकर काम न झाल्याने आणि अपुऱ्या सोयी सुविधांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
 
विशेष म्हणजे कर्मचारी नसल्याने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सेव्हिंग खाती आणि विविध योजनांचा लाभ मिळण्यास दिरंगाई होत असल्याने नागरिक आणि खातेदार संताप व्यक्त करित आहेत.
 
 
येथील आधार कार्ड नोंदणी केंद्र अपुऱ्या सेटअपमुळे गेली अनेक महिने बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांना आधार कार्ड नोंदणी अपडेट करता येत नाही आहे. तसेच मागील दीड वर्षांपासून येथील जनरेटर बंद पडले आहे. परिणामी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर पोस्ट ऑफिस मधील सर्व कामे ठप्प होत आहेत.
  
पावसाळ्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबू नये यासाठी पाली पोस्ट ऑफिसमध्ये जनरेटरची सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. म्हणून लवकरात लवकर जनरेटर दुरुस्त करावा, अशी मागणी अॅड. नोवेल चिंचोलकर यांनी केली आहे.
 
 
रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. अनेक कामांना विलंब होत आहे. मनिऑर्डर, स्पीडपोस्ट, पार्सल देणे किंवा घेणे, पोस्ट तिकीट, लिफाफा, पोस्टकार्ड घेणे, पैसे जमा करणे अशा छोट्या कामांसाठी देखील खूप वेळ जातो. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सेव्हिंग खाती आणि विविध योजनांचा लाभ मिळतांना देखील दिरंगाई होत आहे.
"पोस्ट ऑफिसमध्ये अपुऱ्या सोयीसुविधा असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शासनाने याची दखल घेऊन सोयीसुविधा पुरवाव्यात. तसेच रिक्त जागा देखील भरण्यात याव्यात."
-अॅड. नोवेल चिंचोलकर, पाली
"पाली उप डाकघर कार्यालयातील आधार कार्ड नोंदणी केंद्रात अपुऱ्या वस्तू अभावी ते बंद आहे. त्या संदर्भात आणि रिक्त पदांसंदर्भात अनेक वेळा जिल्हा पोस्ट कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. मात्र अजूनही त्याची दखल घेतली गेली नाही. कार्यालयातील बंद अवस्थेत असलेला जनरेटर लवकरच सुरू करण्यात येईल."
-सरोजा रुमडे, पोस्ट मास्तर, पाली