सोन्याची नाणी विकत देण्याच्या बहाण्याने कस्टम अधीक्षकाची फसवणूक; घातला १३ लाखांचा गंडा

By Raigad Times    11-Jul-2022
Total Views |
fraud
 
 
पनवेल | इंग्रजांच्या काळातील सोन्याची नाणी विकत देण्याच्या बहाण्याने एका टोळीने कस्टम विभागातील अधीक्षकाकडून तब्बल १३ लाख ५० हजार रुपये उकळून त्याला ५०० खोटी आणि बनावट नाणी देऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. न्हावा शेवा पोलिसांनी या टोळीतील त्रिकुटाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
 
नेमके काय घडले?
या प्रकरणात फसवणूक झालेली व्यक्ती भारतीय कस्टम विभागात अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. राजू प्रजापती नावाच्या व्यक्तीने आपल्याकडील इंग्रजांच्या काळातील सोन्याची नाणी विकायची असल्याचे सांगितले आणि त्याबाबत बोलणी करण्यासाठी कळवा येथे येण्यास सांगितले. तेथे प्रजापतीने एक महिला आणि पुरुष यांच्यासह अधीक्षकाची भेट घेतली. त्यानंतर त्या तिघांनी त्यांच्याकडे असलेली १५०० सोन्याची नाणी दाखविल्यानंतर त्यातील १५-२० नाणी तपासण्यासाठी अधीक्षकाने मागून घेतली. मात्र त्या तिघांनी त्याला फक्त एकच नाणे दिले. अधीक्षकाने ते नाणे तपासून घेतले असता, तेही खरे असल्याचे सोनाराने त्याला सांगितले. त्यानंतर अधीक्षकाने त्रिकुटाकडे असलेली सर्व सोन्याची नाणी विकत घेण्याची तयारी दर्शविली असता टोळीने त्याला १५ लाख रुपये घेऊन भिवंडी येथील मानकोली नाका येथे येण्यास सांगितले. अधीक्षकाने घरातील दागिने गहाण ठेवून, मित्रांकडून उसने पैसे घेऊन जमवलेले १३ लाख ५० हजार रुपये त्रिकुटाला दिले आणि त्यांच्याकडील नाणी घेतली. त्यानंतर अधीक्षक नाणी घेऊन उलवे येथे आल्यानंतर त्याने सोनाराकडून हे दागिने तपासून घेतले. सोनाराने ती खोटी आणि बनावट असल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे अधीक्षकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने न्हावाशेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.