पेण । आर्थिक संकटापासून ते कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत तारेवरची कसरत करणाऱ्या एसटी महामंडळाला आपला कारभार सुरळीतपणे चालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे उलथापालथ करावी लागत आहे. अनेक अडचणी समोर असताना देखील विविध प्रकारची शक्कल लढऊन हे एसटी मंडळ आपली लालपरी रस्त्यावर सुस्थितीत धावण्यासाठी प्रयत्न करत आहे. रायगड एसटी महामंडळाने मागील दोन ते तीन वर्षात जवळपास ५५ बसेस स्क्रॅप मध्ये काढून त्यातून ९२ लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. तर उर्वरित कामी येणारे साहीत्य भंगारात न काढता इतर नव्याने पुनर्बांधणी करण्यात येणाऱ्या बसेस साठी वापरून टाकाऊ पासून टिकाऊ ही यशस्वी संकल्पना राबवली आहे.
ग्रामीण भागातील प्रवासासाठी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांच्या पसंतीत उतरलेली लालपरी म्हणजेच एसटी प्रवाशांची सुखासोय पूर्ण करून आपल्या कर्मचाऱ्यांची पगारे देखील पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळी तारेवरची कसरत करत असते. एसटी मंडळाचा जास्तीत जास्त नफा कसा होईल आणि आर्थिक कोंडी कशाप्रकारे फोडून काढता येईल याचा विचार करून एसटी महामंडळ विविध प्रकारचे निर्णय घेत असते. त्याचाच एक भाग म्हणजे रायगड एसटी महामंडळाने टाकाऊ पासून टिकाऊ ही वापरलेली संकल्पना. रायगड एसटी महामंडळाच्या मागील दोन ते तीन वर्षातील जवळपास ५५ बसेस भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या एसटी बसेस नुसत्या भंगारात काढून जास्त नफा कसा मिळणार याचा विचार करुन रायगड एसटी महामंडळाने भंगारातील बसेसच्या काही भागांचा वापर नव्याने पुनर्बांधणी करण्यात येणाऱ्या बसेससाठी वापरण्याचा निर्णय घेतला.
यामध्ये वापरण्यात येणाऱ्या च्यासीसचे असेम्ब्ली (इंजिन, गिअर बॉक्स, प्रॉपेलर शाफ्ट, फ्रंट एक्सल, डिफरेंशियल इत्यादी) काढून चालनात असणाऱ्या बसेसला वापरण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे गाडीच्या बॉडीचे पत्रे, सीट, अँगल, विंडो, काचा हे देखील जे वापरण्याजोगे आहे, ते सामान चालनात असलेल्या गाड्यांना वापरण्यात येत आहे. हे टाकाऊ पासून टिकाऊ असे सामान वापरल्याने एसटी महामंडळाचे लाखो रुपये वाचवण्यात एसटी महामंडळाला यश प्राप्त झाले आहे. तर इतर जो वापरण्याजोगा सामान नसेल तो भंगारात काढून एकूण ५५ बसेसच्या माध्यमातून रायगड एसटी महामंडळाला तब्बल ९२ लाखांचा नफा झाला आहे. म्हणजेच टाकाऊ वस्तू वापरून लाखो रुपये वाचवणे आणि भंगाराच्या माध्यमातून मिळालेले ९२ लाख रुपये लक्षात घेता एसटी महामंडळाने टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेतून कोट्यावधी रुपयांचा फायदा करुन घेतला आहे.
"एसटीच्या ज्या स्क्रॅप केलेल्या ५५ गाड्या होत्या त्या गाड्या सरसकट भंगारात काढल्या असत्या तर आम्हाला इतर गाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी नवे साहित्य खरेदी करण्यासाठी महामंडळाचा पैसा वापरावा लागला असता, माञ आम्ही टाकाऊ पासून टिकाऊ ही संकल्पना राबऊन जे भंगारातील उपयोगात येणारे साहित्य आहे ते इतर बसेस साठी वापरण्यात आले आहे. यामुळे आमचे लाखो रुपये वाचले आहेत."
- अनघा बारटक्के, रायगड-विभाग नियंत्रक