कलोते धरणात तरुणाचा बुडून मृत्यू, भाचीचा वाढदिवस ठरला आकाशचा शेवटचा दिवस

By Raigad Times    20-Jun-2022
Total Views |
akash
 
 
 
खालापूर । खालापुरातील कलोते धरणावर काही पर्यटक १९ जून ला वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. यातील आकाश नाईक आणि त्याचे सहकारी पोहण्यासाठी धरणात उतरले पण पाणी खोल असल्याने मधूनच परत येण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, परतताना आकाश किनारी पोहचलाच नाही. रविवारी त्याचा धरणात शोध घेतला पण तो सापडला नाही. तर आज (२० जून) आकाशचा मृतदेह खोल पाण्यातून शोधून बाहेर काढण्यात आला.
 
कारगाव, कर्नाटक येथील असलेला आकाश नाईक पुणे येथे कॉल सेन्टर मध्ये कामाला होता. आकाश नाईकच्या भाचीचा वाढदिवस होता त्यामुळे त्याचे कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणी वाढदिवस साजरा करण्यासाठी खालापुरातील लोधिवली येथे नातेवाईकाकडे आले होते. ते सर्व लोधीवलीच्या रिलायन्स कॉलनी मध्ये आले होते. पण तिथे एवढ्या लोकांना पार्टी करायला परवानगी नसल्याने कालोते येथे फार्महाऊसला वाढदिवस साजरा करण्यासाठी आले. तेव्हा मौजमजा करीत असताना आकाशसह ४ ते ५ जण पोहायला धरणात गेले. पोहत असताना काही अंतरावर खोलगट भाग असल्याने सर्वांनी माघारी येण्याचा निर्णय घेतला. तेव्हा माघारी येताना सर्वात शेवटी असलेला आकाश केव्हा बुडाला त्यांना कळलेच नाही.
 
त्यानंतर मित्र व कुटुंबियांनी धरणामध्ये आकाशचा शोध घेतला, गावकरीही मदतीला आले. गावाकऱ्यापैकी एकाने अमित गुजरे यांना फोन केला. अमित गुजरे यांनी गुरुभाऊ साठीलकर यांना कळविल्यानंतर, खालापूर पोलीस निरीक्षक विभुते यांना कळविल्यानंतर यंत्रणा कामाला लागली. काल रविवारी शोध मोहीम सुरू झाली पण संध्याकाळी अंधार पडल्यामुळे थांबावली आज सोमवारी सकाळी ६ वाजता पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली व अवघ्या तीन तासात ३० फूट खोल बुडालेल्या आकाश नाईकचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला.