चुलत बहिणीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला सक्तमजुरी

श्रीवर्धनमधील घटना; माणगाव विशेष न्यायालयाचा निर्णय

By Raigad Times    07-May-2022
Total Views |
Court Hammer 
 
दिघी । 15 वर्षीय अल्पवयीन चुलत बहिणीला कामानिमित्त घरात बोलावून तिच्यावर अत्याचार करणार्‍या 40 वर्षीय नराधमाला माणगाव येथील विशेष पोक्सो न्यायालयाने 14 वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
 
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीत 20 फेब्रुवारी 2015 रोजी सकाळी ही घटना घडली होती. पीडित मुलगी व अत्याचार करणारा इसम हे नात्याने चुलत भाऊ-बहीण आहेत. या इसमाने पीडित मुलीला आपल्या घरी कामानिमित्त बोलवून, तिला घराच्या माळ्यावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास घरच्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
 
दिघी सागरी पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी केला. बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमाला अटक करुन त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
 
सुनावणीअंती माणगाव येथील विशेष पोक्सो न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अटकेपासून आजपर्यंत तुरूंगात असलेल्या त्या नराधमाला चौदा वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
 
या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. जितेंद्र म्हात्रे यांनी बाजू मांडली. दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक यु.एल. धुमास्कर यांनी पैरवी अधिकार्‍याची भूमिका बजावली. तर महिला पोलीस हवालदार छाया कोपनार, हवालदार शशिकांत कासार तसेच शशिकांत गोवळकर व सोमनाथ ढाकणे यांनी तपासकामी सहकार्य केले.
 
याशिवाय दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सध्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमन व प्रकाश सुर्वे यांनी साक्षीदार व पंच यांचे जबाब नोंदविण्यात महत्वाची भूमिका बजावली. गुन्हेगारांना शिक्षा होऊन समाजात योग्य संदेश दिल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.