बबन पाटील शिवसेनेचे नवे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख ... पुन्हा एकदा पुनर्वसन

02 May 2022 13:17:24
Baban Patil Shiv Sena's new Raigad district liaison chief ... once again rehabilitation
 
कर्जत | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे रायगड जिल्ह्यातील विश्वासू म्हणून समजले जाणारे बबन पाटील यांच्यावर मातोश्रीने पुन्हा विश्वास दाखवला आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले तेंव्हा बबन पाटील कोकण म्हाडाचे सभापती बनले होते.
 
मात्र बाळासाहेबांच्या नंतर बबन पाटील हे शिवसेनेत अडगळीच्या नेते बनले होते,पण आता त्यांच्या खांद्यावर रायगड जिल्ह्याचे संपर्कप्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या रायगड जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचे नाव म्हणून बबन पाटील यांचे नाव निरंतर राहणार आहे.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सावली म्हणून देखील बबन पाटील यांची ओळख होती. बाळासाहेब यांचे निधन झाल्यानंतर बबन पाटील यांचे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात महत्व कमी झाल्याचे दिसून आले.
 
तब्बल २२वर्षे म्हणजे दोन तप बबन पाटील हे रायगड जिल्हाप्रमुख होते, त्यांच्या जिल्हाप्रमुख पदाच्या काळात रायगड जिल्ह्याच्या सर्व १५ तालुक्यांची जबाबदारी त्यांच्याकडे असायची.
 
तर शिवसेनाप्रमुख यांचा रायगड जिल्हा दौरा आहे किंवा कर्जतच्या फार्महाउस वरील साहेबांचा मुक्काम असो बबन पाटील हे सावली सारखे सोबत असायचे. राज्यात १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता आली त्यावेळी बबन पाटील यांना महामंडळ देण्यात आले होते.
 
बबन पाटील हे कोकण गृहनिर्माण मंडळ म्हणजे म्हाडा चे सभापती बनले होते. जिल्हाप्रमुख म्हणून बबन पाटील यांची जिल्ह्यावर कमांड असायची.
 
त्यांच्या जिल्हाप्रमुख पदाच्या काळात शिवसेनेचे खालापूर, श्रीवर्धन आणि महाड या तीन विधानसभा मतदारसंघात आमदार निवडून आले होते. युती सरकारच्या काळात प्रभाकर मोरे यांना मंत्री होण्याचा बहुमान देखील मिळाला होता.
 
शिवसेनेच्या उदयाच्या काळात रायगड जिल्ह्याची कमान ज्यांच्या हाती होती ते बबन पाटील यांना बाळासाहेब यांच्या एक्सझिट नंतर पक्षाच्या मुख्य जबाबदारीतून मुक्त केले गेले. बबन पाटील यांच्यानंतर शिवसेना रायगड मध्ये आता प्रशासकीय सोयीसाठी तीन तीन जिल्हा प्रमुख कार्यरत आहेत.
 
त्यामुळे बबन पाटील जिल्हाप्रमुख असताना एक आवाज असायचा, मात्र वेळ कोणासाठी थांबत नाही या निसर्ग नियमानुसार रायगड जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असताना जिल्ह्याची पाळेमुळे माहिती असलेली बबन पाटील यांच्यावर पुन्हा एकदा मातोश्रीने जबाबदारी दिली आहे.
 
शिवसेनेच्या प्रशासकीय कामकाजात महत्वाचे पद म्हणून समजले जाणारे संपर्क प्रमुख पद आता बबन पाटील यांच्याकडे आले आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे दोन संपर्कप्रमुख कार्यरत होते, पैकी शिवसेना उपनेते अनंत तरे यांचे गतवर्षी निधन झाले आहे, तर मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी हे रायगड जिल्ह्यात फिरकत नव्हते.
 
त्यामुळे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विना होता. त्यामुळे शिवसेना पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका लक्षात घेऊन पक्षीय बदल केले जात असल्याची चर्चा आहे.
 
त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी रायगड जिल्ह्याचा कोपरा ना कोपरा अवगत असलेले बबन पाटील यांच्याकडे जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय मातोश्रीने घेतला आहे. बबन पाटील यांचे रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, उरण, पनवेल या तालुक्यात तर दररोज उठबस असते.
 
त्यामुळे बबन पाटील यांच्या नियुक्तीने शिवसेनेत पुन्हा एकदा नवचैतन्य पसरले आहे. रायगड जिल्ह्यात यापूर्वी शिवसेना सचिव आदेश बांदेकर, ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांनी देखील संपर्कप्रमुख म्हणून काम केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0