नांदगाव ग्रामपंचायतच्या सरपंच यांनी पदाचा गैरवापर करून कुटुंबियांना केले लखोपती...

मात्र कोकण आयुक्त यांनी केले पद रिक्त

By Raigad Times    14-May-2022
Total Views |
Sarpanch of Nandgaon Gram Panchayat abused his position and made his family lakhs ...
 
कर्जत | कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतच्या थेट सरपंच दीपिका भानुदास जंगले तथा दीपिका नाना आसवले यांचे सरपंच पद कोकण आयुक्त यांनी अपात्र ठरवले आहे. सरपंच म्हणून काम करताना पदाचा गैरवापर करून आपल्या कुटुंबीय आणि नातलग यांना आर्थिक फायदा मिळवून देतानाच कोविड काळात रक्कम खर्च करताना वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी न करणे आणि १४ तसेच १५ वित्त आयोगाच्या निधीची अयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
 
अपहार केल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी यांनी तक्रारी अर्ज दाखल केले होते. त्यावर कोकण आयुक्त यांनी थेट सरपंच दीपिका आसवले-जंगले यांचे पद बडतर्फ करतानाच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कोकण आयुक्त यांनी दिले आहेत.
 
नांदगाव ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच म्हणून दीपिका भानुदास जंगले या २०१८ मध्ये निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांनी एकत्र येऊन सत्ता मिळविली आणि सत्तेचा कारभार सुरु झाला. पण सरपंच यांचे सरकारी नोकर असलेले पती नेहमी कार्यालयात येऊन बसायचे आणि ते देखील सरपंच यांच्या खुर्चीत.
 
त्यामुळे त्यावरून वादंग झाला, मात्र मुद्रांक शुल्क, १४ वित्त आयोग आणि १५ वित्त आयोग यांचा निधी खर्च करताना सरपंच दीपिका जंगले यांनी आपल्या कुटुंबीय, नातलग यांना आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न सुरु केला. सरपंच जंगले यांनी आपले भाऊ, मामे भाऊ, दीर, बहिणीचे पती, वडील, आदी कुटुंबीय आणि नातलग यांच्या नावे लाखो रुपयांची रक्कम वळविली.
 
त्यात १४ वित्त आयोगाची कामे, मुद्रांक शुल्क खर्च करताना आपल्या सदस्य मंडळाला विचारत घेतले नाही आणि आपल्याला हवे असलेले धनादेश तत्कालीन ग्रामविकास अधिकारी विकास सराई यांच्या घरी जाऊन धमकावून घेतले असल्याचे त्यांनी चौकशी समितीला दिलेल्या आपल्या उत्तरात लिहून दिले आहे.
 
निधी हडप करण्याचा अनुभव असलेल्या सरपंच यांनी ग्रामपंचायतचे कार्यालय सुस्थितीत असताना त्यांची दुरुस्ती काढली आणि ते काम बिल काढून अर्धवट ठेवले. त्यामुळे आज नांदगाव ग्रामपंचायतचे कार्यालय जिल्हा परिषद शाळेत भारावले जात आहे.
 
तर कोविड काळात तब्बल १३ लाखाची बिले वेगवेगळ्या एजन्सी कडून मिळविली आणि निधी लाटण्याचे काम केले. त्या काळात खरेदी केलेल्या वस्तू नांदगाव ग्रामपन्चायत हद्दीमधील लोकनाच्या घरी काही पोहचल्या नाहीत. असा साधारण ४०लाखाचा अपहार सरपंच दीपिका जंगले तथा दीपिका नाना आसवले यांनी केल्याची तक्रारी दाखल केली.
 
सरपंच जंगले यांच्या सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली. सदस्य उज्वला रवींद्र फोपे,तसेच अन्य सदस्य यांनी त्याविरुदक्ष कर्जत पंचायत समिती कडे तक्रारी केली. त्यानंतर त्या कर्जत पंचायत समितीमध्ये बोलावलेल्या चौकशी समितीसमोर देखील सरपंच हजर राहिल्या नाहीत.
 
त्यामुळे तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,कोकण आयुक्त असा प्रवास करीत सरपंच दीपिका जंगले यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा केला.
 
कोकण विभागीय महसूल आयुक्त विलास पाटील यांनी नांदगाव ग्रामपंचायत च्या थेट सरपंच दीपिका भानुदास जंगले यांनी केलेल्या अपहाराबद्दल ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३५ नुसार त्यांचे सरपंच पद अपात्र ठरविण्यात आले आहे.
 
त्याचवेळी त्यांच्यावर फौजदारी कारवाई कर्जत पंचायत समितीने करावी आणि त्या ग्रामपंचायत मधील सदस्य यांची विभागीय पातळीवर चौकशी करण्याचे आदेश आपल्या आदेशात दिले आहेत.