आगरदांडा ते नांदले रस्त्याची दुरावस्था : कुणबी समाजोन्नती संघातर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन

14 May 2022 11:52:22
Bad condition of Agardanda to Nandle road: Kunbi Samajonnati Sangh's statement to Public Works Department
 
मुरूड | पावसाळा ऐन तोंडावर आलेला असताना मुरुड तालुक्यातील आगरदांडा गावातून जाणारा रस्ता ते नांदले गावाकडे जाणा-या रस्त्याची खाच खळगे व खड्ड्यांमुळे आजही पार दुरावस्था असून याबाबत कुणबी समाजोन्नती संघातर्फे पंचक्रोशी समाज अध्यक्ष संतोष पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप अभियंता यांना एक निवेदन केले.
 
रस्त्याची सात दिवसांत दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थांच्यावतीने आगरदांडा अदानी पोर्ट गेटसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, आगरदांडा गावातून जाणारा ते नांदले गावाला जाणारा मुख्य रस्त्या बाबत दि.१७ फेब्रुवारी रोजी आपणास निवेदन देण्यात आले होते. सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अर्थसंकल्पामध्ये मंजूर असून कामाचे अंदाजपत्रक तांत्रिक मान्यता करिता विभागीय कार्यालयाकडे सादर केले आहे.
 
कार्यालयीन कामे पूर्ण झाल्यानंतर आगरदांडा गाव ते नांदले गावाकडे जाणारा रस्ता दुरुस्ती करता येईल. असे आपल्या कार्यालयाकडून दि.२५ जानेवारी २०२२ रोजी आम्हाला कळविण्यात आले होते.
 
त्यानंतर सदर रस्त्याच्या कामाबाबत आपल्या कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करत असताना देखील सदर काम पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे असताना सदर काम कधी होईल.
 
याबाबतची माहिती आपल्या कार्यालयाकडून मिळत नसल्यामुळे आमच्या परीसरातील कुणबी समाज बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
 
आगरदांडा गावातून जाणारा रस्ता संपूर्णपणे नादुरुस्त झाला असून सदर रस्त्यावरून दोन चाकी, चारचाकी सह अन्य वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
 
यामुळे आजही अपघातामुळे जिवित व वित्त हानीची शक्यता नाकारता येत नाही.सदर रस्त्याचे काम सात दिवसांत न झाल्यास याविरोधात नांदले ते मिठागर परीसरातील सर्व ग्रामस्थांच्यावतीने दि.२० मे २०२२ रोजी आगरदांडा अदानी पोर्ट गेटसमोर रास्ता रोको आंदोलन छेडावे लागेल.
 
मग याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकार्‍यांची राहील.असे कुणबी समाजोन्नती संघातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले असून सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी-रायगड, पोलिस अधीक्षक, मुरुड तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
 
यावेळी कुणबी समाजोन्नती संघातर्फे पंचक्रोशी कुणबी समाज अध्यक्ष संतोष पाटील उपाध्यक्ष रामा आरकर,सचिव सचिन पाटील, हरिश्चंद्र शिवणे, सुरेश पाटील, कृष्णा माळी आदी. उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0