अखेर पावसाळ्यात वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरून विनाविघ्न प्रवास

पाली अंबा नदी पुलाचा अडसर दूर; भालगुल व जांभुळपाडा पुलांचे काम पूर्णत्वाकडे

By Raigad Times    10-May-2022
Total Views |
Finally, in the rainy season, the journey from Wakan Pali Khopoli State Highway was smooth
 
सुधागड-पाली | मागील अनेक वर्ष पाली खोपोली राज्य महामार्गावरील पुलांवरुन पाणी जाऊन सातत्याने धोक्याची स्थिती निर्माण होत होती. शिवाय वाहतुकीस देखील अडथळा निर्माण होई. वाकण पाली खोपोली या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम मागील ५ वर्षांपासून सुरू आहे.
 
या मार्गावर पाली अंबा नदी पुलाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले होते. मात्र हा अडसर दूर झाल्याने या पुलाच्या कामाला वेग आला आहे. तर भालगुल व जांभूळपाडा येथील अंबा नदी वरील नवीन पुलांचे काम पूर्णत्वाकडे आहे. पावसाळ्यात पाली व जांभूळपाडा पुलांवरून पाणी जाते.
 
मात्र येथे आता नवीन उंच, रुंद व अधिक क्षमतेचे पूल झाल्याने पावसाळ्यात पाणी जाणार नाही. यामुळे वाहतूक सुरळीत राहून प्रवासी, चाकरमानी व वाहन चालकांची कित्येक दशकांची गैरसोय थांबणार आहे.
 
तीन महिन्यांपूर्वी जांभूळपाडा अंबा नदीवरील एक पूल बनून तयार झाला असून त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे. येथील दुसर्‍या पुलाचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच भालगुल येथील दोन्ही पूल मे अखेर पर्यंत वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.
 
मात्र पाली अंबा नदीवरील पुलाचे काम थांबले होते. येथील शेतकर्‍यांचे जमीन मोबदला व इतर मागण्यांसाठी एमएसआरडीसी सोबत वाद होता. परिणामी पुलाचे काम रखडले होते. मात्र या प्रकरणी पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
 
त्यांनी एमएसआरडीसी प्रशासन व शेतकरी यांच्यात समेट घडवून आणला. त्यामुळे या शेतकर्‍यांनी देखील जागा देऊ केली. या सर्व प्रक्रियेत पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्यासह एमएसआरडीसी उपअभियंता सचिन निफाडे, पालकमंत्री अदिती तटकरे यांचे खाजगी सचिव श्री. वीरकर आणि शेतकरी यांचे सहकार्य लाभले.
 
| पावसाळ्यात वाहतूक सुरळीत |
पाली अंबा नदीवरील एक पूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल. त्यानंतर जुना पूल तोडण्यास घेतला जाईल. दुसरा नवा पूल नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल. १५ जून पर्यंत जांभूळपाडा अंबा नदीवरील दुसर्‍या नवीन पुलाचे काम देखील पूर्ण होईल.
 
भालगुल येथील दोन्ही पूल झाले आहेत. फक्त एक बाजूचे प्रवेशाचे काम बाकी आहे. स्थानिक शेतकर्‍यांनी सहकार्य केल्यास तेही काम पूर्ण होईल. परिणामी या मार्गावरून पावसाळ्यात वाहतूक सुरळीत होईल. असे एमएसआरडीसी उपअभियंता सचिन निफाडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
 
| महत्वाचा मार्ग |
वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग पुणे मुंबई वरून खोपोलीमार्गे कोकणाकडे जाण्यासाठी वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय मानला जातो. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई बेंगलोर महामार्ग व मुंबई-गोवा महामार्गाला जोडतो.
 
त्याच बरोबर येथून विळे मार्गे पुणे आणि माणगावला ही जाता येते. त्यामुळे मुंबई पुणे तसेच कोकणासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. परिणामी हे तिन्ही पूल पूर्ण झाल्यास येथील वाहतूक सुरळीत होईल.
 
| असे आहेत नवीन पूल |
पाली, जांभूळपाडा व भालगुल या ठिकाणी तब्बल २५ कोटींच्या निधीतून अधिक क्षमता, रुंदी आणि उंचीचे पूल तयार होत आहेत. पाली अंबा नदीवरील नवीन पुलांची रुंदी १६ मीटर आहे.
 
तर लांबी ११० मीटर तसेच जांभूळपाडा पूलांची रुंदी १६ मीटर, लांबी ७० मीटर इतकी आहे. भालगूल पूलांची रुंदी देखील १६ मीटर तर लांबी ५५ मीटर आहे. हे तिन्ही पूल चार लेनचे होणार आहेत. त्यांची भार पेलण्याची क्षमता ७५ टन आहे.
 
------------------------------------------------
जून पर्यंत वाकण पाली खोपोली या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे १०० टक्के काम पूर्ण होईल. फक्त पाली अंबा नदीवरील एका पुलाचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल.
 
- सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी.