वीज वितरणचा रायगडकरांना शॉक; अघोषित भारनियमनामुळे नागरिक हवालदिल

08 Apr 2022 08:32:41
vij bharniyaman
 
अलिबाग । वीज वितरण कंपनीने बुधवारी रात्री अचानक वीज पुरवठा खंडीत करुन रायगडकरांना जोरदार शॉक दिला आहे. सुरुवातीला कोणाच्याच काही लक्षात आले नाही; मात्र थोड्या वेळाने लोडशेडींग असल्याचे समजले आणि सर्वांच्याच पोटात गोळा आला आहे. लोडशेडींगचे वेळापत्रकाबाबत अद्याप नियोजन झालेले नाही. त्यामुळे आठ तासांचे ‘चक्री भारनियमन’ करण्यात येत आहे.
 
उन्हाचे चटके वाढू लागले असतानाच राज्याची विजेची मागणी 30 हजार मेगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यात ताळमेळ बसत नसल्यामुळे राज्यात पुन्हा भारनियमनाचे संकट उभे ठाकले आहे. कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मिती वाढवण्यास मर्यादा असल्याने राज्यात ठिकठिकाणी भारनियमनाचा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.
 
या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी सुमारे 800 ते 1 हजार मेगावॅट वीज अल्पकालीन कराराद्वारे घेण्यासाठी शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील वीज मागणी मार्चच्या अखेरीस 28 हजार मेगावॅटपर्यंत गेली होती. महावितरणच्या कार्यक्षेत्रातील वीजमागणी 24 हजार 400 मेगावॅट तर मुंबईतील वीजमागणी 3600 मेगावॅट होती. एप्रिलमध्येही कमी अधिक फरकाने हीच परिस्थिती कायम आहे.
 
2014 च्या आधी रायगडसह राज्याने भारनियमन अनुभवले आहे. कधी दोन तास, कधी चार तास वीज बंद केली जायची. अंधाराने भरलेला हा काळ अनुभवला आहे. त्यामुळे आता परत भारनियमाचे संकट घोंघावत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यात अचानक वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्यामुळे सुरुवातीला कोणालाच काही कळले नाही. वीज का खंडीत झाली आहे? पुन्हा कधी येणार? याबाबतची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. 
Powered By Sangraha 9.0