बार्जवरील स्फोट प्रकरणी अखेर दोघांवर गुन्हा दाखल; बेपत्ता कामगार सापडले

14 Apr 2022 12:03:58
 file folder
 
 उरण : जेएनपीटी येथिल शॅलो वाटरबर्थ जवळील बार्ज मधील स्फोट प्रकरणी अखेर दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच बेपत्ता झालेले दोन कामगार सोनारी गावात सापडले असल्याची माहिती खुद्द न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी दिली आहे.
 
सोमवारी ( दि११) रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास गंगा बार्जवर स्फोट घडण्याची दुदैवी घटना घडली होती. या स्फोटात एक कामगार ठार तर दोन कामगार गंभीर रित्या जखमी झाले होते. परेश कन्स्ट्रक्शन एण्ड फाऊंडेशन प्रा.लि. या कंपनीची गंगा ही बार्ज जेएनपीटीच्या शॅलो वाटर बर्थ येथे उभी करण्यात आली होती. या बोटीचे मेन्टनन्स व पेंटीगचे काम शिपिंग सोल्यूशन या कंपनीला देण्यात आले होते. त्यावेळेस बार्जच्या एका कंपार्टमेंट मध्ये पेंटीग सूरू असताना रंगाच्या गॅसने पेट घेतल्याने हा स्फोट झाला. या स्फोटात अब्दुल सलाम हा कामगार जागीच ठार झाला. तर दोन कामगार गंभीर रित्या जखमी झाले होते. तसेच दोन कामगार बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत होते.
 
सदर बार्ज वर काम करताना सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता हलगर्जी पणामुळे काम करून घेणारे शिपिंग सोल्यूशन कंपनीचे अशोक कुमार गिरवार सिंग आणि परेश कन्स्ट्रक्शन कंपनीचे सुरक्षा अधिकारी अमन जफर कोलताकर यांनी केले असल्याने त्याच्यावर भा.द.वि. कलम ३०४(अ), ३३७, ३३८, २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असल्याचे न्हावाशेवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मधुकर भटे यांनी सांगितले तर बेपत्ता असलेले इतर दोन कामगार हे सोनारी गावातील त्यांच्या घरी सूखरूप असल्याचे देखिल त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0