पेट्रोलचे शंभर रुपये मागितल्याने लाकडी दांडक्याने केली मारहाण

14 Apr 2022 15:03:21
panvel '
 
नवीन पनवेल:  पेट्रोल भरलेले शंभर रुपये मागितले असता त्याचा राग आल्याने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना किरवली पेट्रोल पंपावर घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
रात्री पावणे बाराच्या सुमारास दोन इसम डिओ स्कुटी क्रमांक एम एच ४६ बीसी ३४३३ वरून पेट्रोल भरण्याकरता आले होते. त्यांनी गाडीमध्ये १०० रुपयाचे पेट्रोल भरले. त्यानंतर हरिकेश यादव याने पेट्रोलचे पैसे मागितले, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला व शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांनतर ते स्कुटी घेऊन पळून जात असताना यादव यांनी त्यांची स्कुटी पकडून ठेवली. त्यानंतर स्कुटी पेट्रोल पंपावर सोडून तुला दाखवतो असे बोलून ते त्या ठिकाणाहून पळून गेले.
 
काही वेळाने दोन्ही ईसम बाराच्या सुमारास त्यांच्यासोबत इतर पाच इसम व एक महिला घेऊन आले. त्यांनी यादव यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हरिकेश यादव हा पळून त्यांच्या ऑफिसमध्ये गेला. त्यानंतर सात इसम व एक महिला असे त्याच्या रूमकडे गेले व रूमच्या बाहेर असलेला बच्चन यादव यास देखील मारहाण केली व ते पळून गेले. यात बच्चन यादव हा जखमी झाला आहे. त्याच्यावर साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, उत्तरशिव येथे उपचार सुरू आहेत.
Powered By Sangraha 9.0