जयंत पाटील यांनी घेतली राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची शाळा; खा.सुनील तटकरे यांनीही जोडले हात!

By Raigad Times    13-Apr-2022
Total Views |
NCP  
 
अलिबाग । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी मंगळवारी (12 एप्रिल) राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची जणू शाळाच घेतली. त्यांनी पदाधिकार्‍यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे एरव्ही पक्षाची विविध पदे घेऊन मिरवणार्‍या पदाधिकार्‍यांची अक्षरशः भंबेरी उडाली. अखेर खा. सुनील तटकरे यांनी हात जोडले आणि येत्या काळात पक्षाची बांधणी करु, असा शब्द देत त्यांनी कार्यकर्त्यांची बाजू मारुन नेली.
 
प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील हे पक्षबांधणीसाठी रायगडच्या दौर्‍यावर आहेत. मंगळवारी अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. अलिबाग येथे पार पडलेला हा कार्यक्रम कार्यकर्त्यांसाठी नेहमीसारखा नव्हता. तालुकाध्यक्ष दत्ता ढवळे यांनी अत्यंत देखणी तयारी केली होती. पालकमंत्री आदिती तटकरे, खा.सुनील तटकरे, आ.अनिकेत तटकरे, महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

NCP
 
जयंत पाटील बोलण्यासाठी उभे राहिले. सर्वांचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे होते. मात्र भाषण सुरु करण्याआधी त्यांनी पदाधिकार्‍यांची झाडाझडती सुरु केली. एका-एका पदाधिकार्‍याचे नाव पुकारले जायचे. पदाधिकारी उभा राहिल्यानंतर त्याने कार्यकारिणी कार्यरत केली आहे का? याची चौकशी व्हायची. त्यातील किती सदस्य कार्यक्रमाला आलेत? असे एक ना अनेक प्रश्न ते संबंधित पदाधिकार्‍याला ते विचारत. त्यामुळे पदाधिकार्‍यांची चांगलीच भंबेरी उडत होती.
 
जिल्हाध्यक्ष सुरेश लाड गैरहजर होते. त्यामुळे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील हे जयंत पाटलांच्या तावडीत सापडले. जिल्ह्यात पक्ष कार्यकारिणी आणि कामकाजाबाबत उत्तर देताना, मधुकर पाटील चांगलेच बावचळले. महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंढे यांनी माझी दोनच महिन्यांपूर्वी या पदावर निवड झाल्याचे सांगून वेळ मारुन नेली. यासोबतच अन्य पदाधिकार्‍यांची चांचलीच ‘त त् प प्’ झाली. पदाधिकार्‍यांचा गोंधळ पाहून सभागृहात हास्याचे कारंजे फुलत होते. कोणालाच हसू आवरत नव्हते.

NCP
 
शेवटी राष्ट्रवादीचे नेते खा. सुनील तटकरे हेच पदाधिकार्‍यांच्या मदतीला धावून आले. तटकरेंनी जयंत पाटील यांच्यासमोर हात जोडले. माफी मागतानाच, “येत्या काळात पक्षबांधणीचे काम आम्ही चांगले करु” असे आश्वासन देत, त्यांनी पदाधिकार्‍यांची बाजू मारुन नेण्याचा प्रयत्न केला. यानंतर जयंत पाटील यांनी पक्षबांधणी कशाप्रकारे केली पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले.