बीडखुर्द येथील पोल्ट्रीमध्ये शॉक लागून एका कामगाराचा मृत्यू

By Raigad Times    12-Apr-2022
Total Views |
khopoli
 
खोपोली : बीडखुर्द येथील वरदविनायक  पोल्ट्रीमध्ये काम करणार्‍या ग्रेगोरी सिलबेरियुस तिर्की या कामगाराचा शॉंक लागून मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ केली आहे. या कामगाराचा मृतदेह अंतिम विधीसाठी छत्तीसगढ येथील त्याच्या गावी पाठविण्यात आला असून या मृत कामगाराच्या कुटुंबाची जबाबदार पोल्ट्री व्यवसायिकाने घेतली आहे.
 
खालापूर तालुक्यातील बीडखुर्द गावातील वरदविनायक पोल्ट्री फार्म दुर्गंधीमुळे गेल्या काही वर्षापासून चर्चेचा विषय बनल्याने ही दुर्गंधी बंद व्हावी म्हणून ग्रामस्थांना अनेक आंदोलने करावी लागली. प्रशासनाकडून पोल्ट्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, व्यावसायिकाकडून पोल्ट्री बंद ठेवण्यात आली असून या पोल्ट्रीच्या अंतर्गत दुरुस्तीचे काम सुरू असताना ८ एप्रिल रोजी येथील एका कामगाराचा शॉंक लागून मृत्यू झाला आहे.
 
वरद विनायक पोल्ट्रीफॉर्ममध्ये कामाला असलेला ग्रेगोरी तिर्की, (वय ३१) , मूळ राहणार छत्तीसगड हा तरुण कामगार पोल्ट्री मधील आपले दैनंदिन काम करीत असताना त्याला विजेचा शॉक बसून तो खाली पडला व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोल्ट्रीमधील अन्य कामगार व व्यवस्थापकांनी सदर तरुणास तातडीने खोपोली येथील रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत असल्याचे घोषित केले. याबाबत खोपोली पोलिसांत नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा व मृत व्यक्तींच्या नातेवाईक व अन्य कामगारांचे जबाब नोंदवून पुढील चौकशी सुरू केली आहे.
 -------------------------------------------------
पोल्ट्रीमध्ये काम करणारे सर्व कामगार हे कामगार नसून माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत, त्यामुळे सर्वानी मी माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे जीव लावत असून ग्रेगोरी याचा शॉंक लागून झालेले निधन मनाला चटका लावून गेला आहे. परंतु निधन झालेल्या ग्रेगोरी कुटुंबियांचे जबाबदारी मी घेतली आहे व त्या कुटुंबाला सदैव धीर देण्याचे काम करेन आणि भविष्यात या कुटुंबाला कसलीही कमतरता भासणार नाही याची काळजी घेईन.
 डॉ. बडगुजर (पोल्ट्री व्यवसायिक).