“आयला दिवसभर जेवलो नाही, ‘मिसळ-पावा’वर साहेबांची वाट पाहत बसलो होतो. उपाशी राहिलो, याचे काही नाही; पण ज्यांच्याशी आमचा संघर्ष आहे, शिवसैनिकांना इतकी वर्षे जे हीनवत होते त्यांच्या घरी आदित्य साहेब जेवायला गेले याचे वाईट वाटले”, रायगड जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकाची ही प्रतिक्रिया आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या घरी जेवायला गेले आणि शिवसैनिकांमध्ये कालवाकालव सुरु झाली.
महाआघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते एकत्र असले तरी रायगडमध्ये मात्र दोन पक्षातील संघर्ष कायम आहे. तटकरे हे स्वतः खासदार आहेत, लेक मंत्री, मुलगा आमदार अशी तीन पदे घरात आहेत. यापूर्वीही अनेक वर्षे तटकरेंकडे प्रमुख पदे राहिली आहे. तरीदेखील जिल्ह्यात सर्वांत मोठा पक्ष शिवसेनाच आहे. प्रतिकूल परिस्थितीत शिवसैनिकांनी राष्ट्रवादीला अग्रक्रम मिळू दिला नाही. तटकरेंनाही त्यांचा पक्ष मोठा करायचा आहे. त्यामुळे जमेल तिथे शिवसेनेची मुस्कटदाबी सुरु आहे.

‘पालकमंत्री हटाव’चा नारादेखील शिवसेना आमदारांनी दिला. गुढीपाडव्यापर्यंत काहीतरी निर्णय होईल, या आशेवर आमदार बसले होते. मात्र शिवसेना नेत्यांकडून कुठलीही हालचाल झाली नाही. उलट, राष्ट्रवादीकडूनही ‘झुकेगा नही...’ची टॅगलाईन घेत या आमदारांना खिजविण्यात आले. यानंतरही “गप्प बसा, निधी माझ्याकडे मागा” अशा शब्दांत पक्षप्रमुखांकडून सांगण्यात आले, तेव्हापासून राष्ट्रवादीकडून होणारा अपमान गिळून आमदार बसून होते. परवा आदित्य ठाकरे यांची सभा माणगाव येथे झाली. या सभेत ते काहीतरी बोलतील, अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती; मात्र तसे झाले नाहीच, अनपेक्षितपणे ते जेवायलाच पालकमंत्र्यांच्या घरी गेले.
आदित्य ठाकरे हे तटकरे यांच्या घरी जेवायला गेले...की ते सुतारवाडीला कसे येतील? याचा डावच रचण्यात आला, हे माहित नाही; परंतू यानिमित्ताने “शेकाप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा संघर्षांची आठवण झाली आहे. जिल्ह्यामध्ये शेकाप आणि काँग्रेस जेव्हा एकमेकांचे प्रमुख विरोधक होते, तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शेकापवर अनेक आरोप केले जायचे. अक्षरशः हल्लाबोल व्हायचा, अनेक कळीचे मुद्दे पुढे केले जायचे. आता काय होईल आणि काय नाय? असे वाटायचे. शेकाप नेते मात्र यावर कुठेही व्यक्त होत नसत.
काँग्रेसचे मंत्री जेव्हा रायगडात येत, तेव्हा काँग्रेस कार्यकर्ते खूशीत असायचे. शेकापवर काहीतरी बोलणार, यासाठी ते आसुसलेले असायचे. सभा व्हायच्या, शेकापविरोधात स्थानिक नेते मोठमोठी भाषणं करायचे, मात्र सभा झाली की मंत्री जेवायला मात्र पेझारीला... तशी व्यवस्था शेकापकडून आधीच केली जायची. शेकापचे न बोलता काम व्हायचे. स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांची हवा गूल झालेली असायची. नाराज कार्यकर्ते मग आपल्याच नेत्याला शिव्या घालत घरी परतायचे. असे अनेक वर्षे चालले. माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी काँग्रेस नेत्यांच्या या हरकतीला विरोधदेखील केला; पण तोपर्यंत काँग्रेस तळाला गेला होती.
शेकापच्या जागी आता सुनील तटकरे आणि काँग्रेसच्या जागी शिवसेना कार्यकर्ते आहेत. महाआघाडीत असल्यामुळे आदित्य ठाकरेंना तटकरे कधीही घरी जेवायला बोलावू शकले असते; पण तसे केले नाही. शिवसेनेच्या मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे सुतारवाडीला कसे येतील? याची व्यवस्था तटकरेंनी केली. आदित्य ठाकरेंसोबतची छायाचित्रे काही क्षणातच व्हायरल झाली. तटकरेंचा डाव यशस्वी झाला होता. ‘पालकमंत्री हटाव’ची शिवसेनेची हवा गूल झाली....हा घाव शिवसैनिकांच्या जिव्हारी बसला होता. आदित्य ठाकरे निघून गेले...शिवसैनिक मात्र कन्हत पडला आहे.
- राजन वेलकर, अलिबाग