युद्धाच्या नावाने व्यापाऱ्यांकडून लूट; गहू, तेलाच्या दारात अचानक वाढ

09 Mar 2022 13:51:37
shopping cart
 
औरंगाबाद | युद्धाच्या नावाने व्यापाऱ्यांकडून लूट सुरू असल्याचा आरोप किराणा दुकानांमध्ये ग्राहक करत आहेत. कारण, गहू, तेलाबरोबरच मसाल्याचे पदार्थच्या किंमती अचानक महाग झाल्यानं लोक हैराण झाले आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिसून येत असताना महाराष्ट्रात मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने लोकांना हैराण केलं आहे. देशभरात तेल आणि गव्हाची भाववाढ सुरू झाली आहे. त्यात साखर, तेल, गहू, आटा, रवा, मैदा, लाल मिरची आणि मसाल्याचे दर अचानक वर गेले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या नावाने व्यापाऱ्यांकडून लूट सुरू असल्याचा आरोप ग्राहक करत आहेत.
 
तेलाच्या दरात अचानक वाढ झाली आहे. तेलाचे दर किलोमागे २० ते ४० रुपये महागले आहेत. गहू, आटा, मैदा याच्या दरात मोठी वाढ झाली. भारतीय गव्हाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्याने गव्हाच्या दरात प्रतिकिलोमागे तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. पण व्यापारी मात्र, आयात निर्यात आणि सरकारच्या धोरणामुळे ही वेळ आल्याचं सांगत आहेत.
आठवडाभरात सोयाबीन तेलाचे १३० रुपये किलो असणारे दर १६० रुपये झाले.
 
किराणा दुकानात गेल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या प्रत्येक दरात वाढ झाल्याचे दिसून येतंय.
महिनाभरापूर्वी मसाल्याच्या दरात वाढ होताना दिसत होती. पण त्यात अधिक भडका पडला. जिरे दोन दिवसांपूर्वी २०० रुपये किलो होत़े त्याचा दर आता २५० रुपये किलोपर्यंत गेला आहे.
 
दालचिनी २९० किलोवरून ३३० रुपये किलो, लाल मिरचीचे दर २२० रुपयांवरून २५० रुपयांवर, रवा आणि मैदा हे दरही वाढले आहेत.
 
दोन दिवसांपूर्वी २ हजार ४६० रुपये क्विंटल असणाऱ्या रव्याचा दर आता २६६० रुपये झाला आह़े तसेच मैद्यात २०० रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे.
 
चांगल्या प्रतीच्या शरबती गव्हाच्या किमतीत प्रतिकिलो दोन रुपये वाढ झाली आहे.
 
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने देशात लवकरच इंधन दरवाढीचे संकेत आहेत़. मात्र, इंधन दरवाढ अद्याप झाली नसताना जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मात्र वाढ झाली. रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम जगभरात काय होतील ते भविष्यात कळेल. पण या युद्धाच्या नावावर मात्र राज्यातील सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत.
Powered By Sangraha 9.0