मोठी बातमी : महाडजवळ जिलेटीन, डिटोनीटरचा स्फोट; रायगड बॉम्ब शोधक पथकातील तीन पोलीस जखमी

08 Mar 2022 22:35:56
BDDS Raigad
 
अलिबाग । जप्त केलेली स्फोटके नष्ट करताना अचानक झालेल्या स्फोटात रायगड बॉम्ब शोधक पथकातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून, महाड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे.
 
महाड तालुक्यातील इसाने कांबळे हद्दीत आज (8 मार्च) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रायगड बॉम्ब शोधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद व सहकारी यांना माणगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले जिलेटीन व डिटोनिटर आदी स्फोटक मुद्देमाल नष्ट करण्याचा आदेश देण्यात आले होते.

BDDS Raigad
 
त्यानुसार, आज सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास इसाने कांबळे हद्दीत जावेद ईसाने याच्या क्रशरच्या मागे ही स्फोटक सामुग्री नष्ट करीत असताना अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत बॉम्बशोधक पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिर्वाद महादू लडगे (वय 45) व पोलीस नाईक रमेश राघो कुथे (वय-36) हे दोघे गंभीर झाले आहेत.
 
त्यांना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे औषधोपचार करुन त्यांना पुढील उपचाराकरिता मुंबईतील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच पोलीस नाईक राहुल महादेव पाटील हे या घटनेत किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, महाड येथे औषधोपचार करण्यात आले आहेत. त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0