रोह्यात सहाय्यक गट विकास अधिकारी पंडीत राठोड यांना लाच स्वीकारताना अटक

By Raigad Times    25-Mar-2022
Total Views |
RATHOD
 
रोहा । रोहा पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी पंडीत कौरू राठोड यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. तद्नंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान राठोड यांच्याकडे तळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आले होते. दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
 
 
नवी मुंबई येथील कोकण भवन येथील कार्यालयात एका विभागीय चौकशी मध्ये तक्रारदार यांच्या बाजूने अहवाल पाठवण्यासाठी पंडीत राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याविरोधात लाच लुचपत विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. या अनुषंगाने 28 फेब्रुवारी 2022 रोजी पंडीत राठोड यांनी तक्रारदार यांच्या कडून पाच हजार रुपये स्वीकारले. उर्वरीत रक्कम दहा हजार रुपये शुक्रवार दि.25 मार्च 2022 रोजी पंच व साक्षीदारांच्या समक्ष घेताना रंगेहाथ पकडले. लाच लुचपत विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशानुसार उप अधीक्षक सुषमा सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली पो.ह.कौस्तुभ मगर, पो.ना. विवेक खंडागळे, जितेंद्र पाटील, म.पो.ना.स्वप्नाली पाटील यांच्या पथकाने सापळा रचून यशस्वी कारवाई केली.