धोकादायक गतिरोधकांमुळे आयुष्यालाच गतिरोध

By Raigad Times    23-Mar-2022
Total Views |
Speed Breaker
 
पनवेल | गतिरोधक बसविल्याने वाहनांचे अपघात कमी होतील अशी अपेक्षा असताना गतिरोधकांच्या दुरावस्थेमूळे वाहनांची नासधुस होत असल्याचे प्रकार तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरील प्रवासादरम्यान अनुभवायला मिळत आहेत. मुख्य रस्त्यावरील गतिरोधक वेळीच दुरूस्त न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता वाहनचालकांकडुन वर्तविली जात आहे. याबाबत तळोजा वाहतुक पोलिसांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तळोजा कार्यालयाला चार पत्रे पाठविली आहेत. मात्र, वाहतुक पोलिसांच्या पत्राला म.औ.वि.महामंडळाकडुन केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे धोकादायक गतिरोधकांमुळे आयुष्यालाच गतिरोध लागला असल्याची प्रतिक्रिया वाहन चालकांनी व्यक्त केली आहे.
 
तळोजा एम.आय.डी.सी. मध्ये अनेक कारखाने आहेत. त्यामध्ये रासायनिक इलेक्ट्रिकल, फिशर व इतर कारखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे, कंपन्यांमध्ये माल उतरवण्यासाठी तसेच घेऊन जाण्याकरता मोठ्या संख्येने अवजड वाहने येतात. त्याचबरोबर एम.आय.डी.सी. च्या मुख्य रस्त्यावर महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाकडुन गतिरोधक उभारण्यात आले आहेत. मात्र, येथील सर्व गतिरोधकांची दुरावस्था झालेली आहे. या दुरावस्था झालेल्या गतिरोधकामुळे दिवसा व विशेष करून रात्रीच्या वेळेला वाहन चालकांना गतिरोधकांचा अंदाज न आल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
 
या बाबत तळोजा वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी औदयोगिक विकास महामंडळाला एम.आय.डी.सी. हद्दीतील मुख्य रस्त्यावरील दुरावस्था झालेले गतिरोधकांची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी आतापर्यंत चार पत्रे पाठविली आहेत. मात्र, वाहतुक पोलिसांच्या पत्रांना केराची टोपली दाखवण्यात आली. या नादुरुस्त गतिरोधकांमुळे रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने लवकरात लवकर गतिरोधकांची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.
दुरावस्था गतिरोधकामुळे घडतात अपघात
 तळोजा एमआयडीसी येथील मुख्य रस्त्यावरील गतिरोधकांची दुरावस्था झालेली आहे. यामुळे या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नुकताच रात्रीच्या सुमारास रामकिशन चौक या ठिकाणी मोटार सायकल वरील चालक सुरेश पवार हे बेलनाका ते नावडा फाटा येत असताना रामकिशन चौक येथील गतिरोधक अर्धवस्थेत तुटलेले असल्याने त्याचबरोबर पांढरे पट्टे नसलेने त्या दुचाकी चालकाला येथील गतिरोधक दिसला नाही. त्यामुळे दुचाकी घसरली व दुचाकी चालकाच्या डोक्याला जोरदार मार बसला व गंभीर जखमी झाला. यावेळी त्या जखमीला उपचारार्थ रुग्णालयात दखल केले. मात्र, अश्या प्रकारे अनेक अपघात घडले आहेत.
 
वाहतूक शाखेकडून गतिरोधकांसाठी चार पत्रं
 तळोजा हद्दीतील वाहतुक कोंडी, बेकायदेशीर पार्किंगवर विशेष मोहीम घेऊन कारवाई करीत आहोत. त्याचबरोबर मुख्य रस्त्यावर गतिरोधकांची दुरावस्था झालेल्या आहेत. त्यामुळे, अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. हे गतिरोधकांची दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाच्या तळोजा कार्यालयाला आतापर्यंत चार पत्र पाठविले आहेत. आता पाचवे पत्र तयार करीत आहोत. म.औ.वि.म कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही. लवकरात लवकर गतिरोधकांची दुरुस्ती करावी. जेणेकरून अपघाताला आळा घालता येईल.