अलिबाग पंचायत समिती सदस्य, बैलगाडीप्रेमी उमेश वर्तक यांचे निधन

23 Mar 2022 00:03:18
umesh vartak
 
बैलगाडी जिंकली; पण मृत्यूने उमेशचा पराभव केला...
 
अलिबाग । अलिबाग पंचायत समितीचे सदस्य उमेश वर्तक यांचे मंगळवारी (२२ मार्च) सायंकाळी निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. बैलगाडी स्पर्धा पाहत असताना उमेश यांचा अपघात झाला होता. त्यांच्या मृत्यूमुळे वरसोली परिसरात दु:खाचे सावट पसरले आहे.
 
उमेश वर्तक हे वरसोली येथील रहिवासी आणि बैलगाडीप्रेमी म्हणून परिचित होते. राजकारणाशी कुठलाही संबंध नसलेल्या उमेश वर्तक यांना अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग पंचायत समिती निवडणुकीत उभे केले आणि जिंकूनही आणले.
 
उमेश वर्तक यांनी महिनाभरापूर्वी आपली बैलगाडी एका स्पर्धेत उतरवली होती. स्पर्धेत उमेश यांची गाडी सर्वांत पुढे होती. आपल्या बैलांची करामत उमेश भारावून पाहत होते. इतक्यात मागून आलेल्या एका बैलगाडीचा धक्का उमेश यांना लागला होता.
 
उमेश यांची बैलगाडी स्पर्धेत जिंकली होती; मात्र अपघातात जखमी झालेले उमेश वर्तक यांचा मृत्यूने पराभव केला. मुंबई येथील एका रुग्णालयात महिनाभर त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेर मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुली असा परिवार आहे.
Powered By Sangraha 9.0