पालीतील सरसगडाची होरपळ

वनसंपदा जळून खाक प्राण्यांचा अधिवास नष्ट

By Raigad Times    11-Mar-2022
Total Views |
sarasgad horpalala
 
सुधागड -पाली | पालीतील प्राचीन सरसगड किल्ल्यावर महिनाभरात तब्बल 6 मोठे मानवनिर्मित वणवे लागले आहेत. या वणव्यामुळे किल्ल्याचा बहुतांश सर्वच भाग जळून होरपळला आहे.
 

sarasgad horpalala
 
यामध्ये किल्ल्यावर नव्याने लावलेले रोपे व संवर्धन केलेली झाडे जळून खाक झाली. शिवाय येथील माकडे, वानरे व पक्ष्यांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच त्यांचा अधिवास देखील नष्ट झाला.
 
स्थानिक नागरिक व वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी वणवा विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यामुळे किमान मानवी वस्तीत आग आली नाही. वारंवार लागणाऱ्या वनव्यांमुळे किल्ल्याची प्रचंड प्रमाणात हानी होत आहे. पालीतील नागरिकांना देखील याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत.
 
---------------------------------------------------------------------------------------------------
 
जैवविविधतेला धोका 
नैसर्गिक व कृत्रिम वणव्यांमुळे सरसगडावरील जैवविविधता व सजीव सृष्टी धोक्यात येत आहे. तसेच प्रदुषण वाढते आहे. पालीकरांना तापमान वाढीला सामोरे जावे लागत आहे. किल्ल्यावरील सरटणारे जीव, (घोरपड, साप, सरडे, विंचु इत्यादी) किटक आणि झाडे-झुडपे, वनस्पती आगीमध्ये भस्मसात झाले. विवीध प्राण्यांचे व पक्षांचे आसरे-निवारे संपुष्टात आले. त्यांची पिल्ले देखिल या आगीत होरपळून मेली.
 
वास्तूंचे नुकसान
वनव्यांमुळे किल्ल्यावरील ऐतिहासिक ठेव्यांचे बांधकाम कमकुवत होऊन ते ढासळण्याच्या स्थितीत आहेत. किल्याच्या तटबंदीवर, बुरुजांवर उगवलेले गवत जळाल्यामुळे त्यांचे नुकसान झाले.
 
ऐतिहासिक प्रतीक सरसगड किल्ला
शिवाजी महराजांनी या गडाचे महत्व ओळखून गडास स्वराज्यात दाखल करुन घेतले. आणि सरसगडाच्या दुरुस्तीसाठी दोन हजार होण मंजुर केल्या होत्या. या नुसार दुर्गमता व विपूल जलसंचय यावर विशेष भर देवून गडाची बांधणी करण्यात आली. दुरवर टेहाळणी करण्यास व इशारा देण्यास "सरस" म्हणून किल्ल्यास सरसगड नाव देण्यात आले.
किल्ल्यावर घोड्याची पागा, धान्य कोठारे, शस्त्रागारे, कैदखाने, दारू कोठारे व देवळ्या खोदून बांधण्यात आली अाहेत. बैठकिच्या खोल्या बांधण्यात अाल्या असून यामध्ये शिबंदी राहत असे. तोफा व बंदूकांचा वापर करण्यासाठी बुरुज व तटास अनेक छिद्रे (जंग्या) ठेवण्यात आली आहेत. बालेकिल्ल्यावर केदारेश्वर मंदिर व त्याभोवती तळे आहे. तसेच शहापिर दर्गा अहे.
 
---------------------------------------------------------------------------------------------
 
बहुतांश वणवे मानवनिर्मित आहेत. वणवे रोखण्यासाठी व आपत्ती निवारणासाठी गावपातळीवर 10 तरुणांची टीम तयार करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मानवनिर्मित वणवे रोखण्यासाठी गावागावातील लोकांचे प्रबोधन व जनजागृती केली जात आहे. ग्रामपंचायतींना देखील आवाहन केले आहे. वणवे रोखण्यासाठी व्हिडीओ डॉक्युमेंटरी केली जाईल. -दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली सुधागड