धक्कादायक! जेवण बनविले नाही म्हणून पत्नीची हत्या

01 Mar 2022 18:15:38
murud mahila murder
 
 हत्या करुन पती पसार, शोध सुरु
 
मुरुड । जेवण बनविले नाही, म्हणून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुरुड तालुक्यातील खोकरी येथे घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनेनंतर पसार झालेल्या पतीचा मुरुड पोलीस शोध घेत आहेत.
 
27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 28 फेब्रुवारी रोजी 11 वाजण्याच्यादरम्यान मुरुड तालुक्यातील खोकरी (पो.राजपुरी) येथे ही घटना घडली. कुंदा उमेश वाघमारे (वय 21, रा. खोकरी, पो. राजपुरी, ता. मुरुड) असे मृत महिलेचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोकरी येथे अब्दुल रहीमान यांचे फार्महाऊस आहे. या फार्महाऊसमध्ये कुंदा व तिचा पती उमेश वाघमारे (वय 26) जोडपे कामगार म्हणून कामाला होते. येथील कामगारांच्या रुममध्येच ते रहायला होते. 27 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीदरम्यान या जोडप्यामध्ये जेवणावरुन वाद झाला.
 
पत्नीने जेवण बनविले नाही, या किरकोळ गोष्टीवरुन संताप अनावर झालेल्या उमेशने पत्नी कुंदाचा गळा दाबून तिची हत्या केली. 28 फेब्रुवारीला फार्महाऊसवरील केअर टेकर या कामगार जोडप्याला बोलवायला त्यांच्या रुममध्ये गेला असता हा प्रकार उघडकीस आला.
 
त्याने तात्काळ घटनेची माहिती मुरुड पोलिसांना दिली. पोलिसांनी खबर मिळताच घटनास्थळी धाव घेतली. मात्र घटनेनंतर उमेश वाघमारे हा पसार झाला असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत.
 
दरम्यान, मुरुड पोलीस ठाण्यात उमेश वाघमारे विरोधात पत्नीच्या हत्येप्रकरणी भा.दं.वि.कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन गवारे करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0