कातकरी उत्थान कार्यक्रमाला पोलादपूर तालुक्यात भरगच्च प्रतिसाद

रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांचा कल्याणकारी उपक्रम

By Raigad Times    28-Feb-2022
Total Views |
katkari utthan program
 
पोलादपूर | रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीप्रवण भागात आपत्तीकाळात घ्यावयाची दक्षता व बचावकार्य तसेच मदतकार्य याबाबत प्रशिक्षण शिबिराचे पोलादपूर तालुक्यामध्ये यशस्वी आयोजन केल्यानंतर लगेचच कातकरी उत्थान कार्यक्रमाचे पोलादपूर तालुक्यात आयोजन केले असता या कल्याणकारी उपक्रमालादेखील कातकरी आदिवासी समाजाचा भरगच्च प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
 
रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान व सप्तसुत्री कार्यक्रमांतर्गत शुक्रवार, दि. 18 फेब्रुवारी 2022 रोजी पोलादपूर तालुक्यातील सडवली गावातील आदिवासी वाडी समाजमंदिरामध्ये सडवली, देवपूर, गांजवणे, खडपी, भोगाव, पैठण, कोंढवी येथील कातकरी समाजबांधव व महिलांच्या उपस्थितीत पहिला कार्यक्रम आयोजित केला. यावेळी कातकरी आदिवासी समाजातील महिला व पुरूषांचा कमी अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळत असताना दुसरा कार्यक्रम मंगळवार, दि. 22 फेब्रुवारी 2022 रोजी केवनाळे, करंजे, साखर, देवळे येथील कातकरी महिला व पुरूषांचे एकत्रितपणे कातकरी उत्थान शिबिर पितळवाडी गावातील राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले असता परिसरातील आदिवासी वाडयांतील कातकरी समाजाच्या महिला पुरूष व बालकांसह आबालवृध्दांनी मोठया प्रमाणात गर्दी केली.
 
यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या सुमन कुंभार, तहसिलदार दिप्ती देसाई, नायब तहसिलदार समीर देसाई, संजय मोदी, पुरवठा विभागाचे आबा जगताप तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये कातकरी कुटूंबांच्या रेशनकार्ड संबंधित कामे, विविध प्रकारचे दाखले, मनरेगा जॉब कार्ड आदी प्रकारचे अर्ज घेऊन तयार दाखल्यांचे व रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र पितळवाडीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये आदिवासी कातकरी समाजाच्या महिला व पुरूषांच्या कोवॅक्सीन आणि कोविशिल्ड लसीकरण व विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या.
 
पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथील शंकरमंदिरामध्ये लोहारे, पार्ले, तुर्भे व दिविल येथील कातकरी उत्थानाचा कार्यक्रम तहसिल कार्यालयातर्फे भरगच्च उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून येत्या गुरूवार, दि. 3 मार्च 2022 रोजी कापडे बुद्रुक येथील ग्रुपग्रामपंचायत कार्यालयामध्ये कापडे बुद्रुक, रानबाजिरे, चांभारगणी व आड येथील कातकरी बांधव आणि महिलांचा कातकरी उत्थान व सप्तसुत्री कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून मंगळवार, दि. 8 मार्च 2022 रोजी सवाद येथील शंकरमंदिरामध्ये सवाद, माटवण आणि हावरे येथील आदिवासी वाडीतील कातकरी महिला व पुरूषांना कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत विविध आरोग्य तपासण्या तसेच लसीकरणासह महसुल विभागाकडून देण्यात येणारे विविध दाखले, मनरेगा जॉब कार्ड तसेच कातकरी कुटूंबांच्या रेशनकार्ड संबंधित कामे करून घेण्यात येणार आहे. याप्रसंगी कातकरी समाजाच्या महिला पुरूषांना अन्य समाजबांधवांनी सकाळी साडेदहा वाजता नियोजित स्थळी उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन नायब तहसिलदार समीर देसाई यांनी केले आहे.