नवीन पनवेल | भाड्याची रक्कम व डंपरचा अपहार करून ५५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करंजाडे, सेक्टर ५ येथील राम नरसिंग कांबळे यांचा पारगाव, डुंगी येथे जनता मोटर गॅरेज या नावाने गाडी दुरुस्त करण्याची गॅरेज आहे. त्यांनी हायवा डंपर एम एच ०४ एफ पी ३००४ विकत घेतला. यावेळी शिवदास भानुदास पाळवदे (रा. हेळंब, परळी वैजनाथ,बीड) यांनी त्यांच्या डंपर बाबत विचारपूस केली. यावेळी डंपर भाड्याने चालवतो असे सांगून प्रत्येक महिन्याला एक लाख ६० हजार भाडे द्यावे लागेल असे दोघांमध्ये तोंडी स्वरूपात व्यवहार झाला. त्यामुळे राम यांनी त्याच्या ताब्यात डंपर दिला.
यावेळी डव्हान्स रक्कम देणे बाबत सांगण्यात आले तेव्हा नंतर देतो असे सांगून शिवदास डंपर घेऊन गेला. पैशाची मागणी केली असता त्याने दोन लाख ८० हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र जुलै २०२० ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत ४३ लाख ६० हजार रुपये भाडे दिले नाही. तसेच डंपर परत मागण्यास त्याच्या गावी गेले असता तुझ्या हात पाय तोडतो अशी धमकी देऊन पैसे देणार नाही, जे करायचे आहे ते कर अशी धमकी दिली. व त्याची धनंजय मुंडे यांच्या पीए बरोबर चांगली मैत्री असून तू कसा काय गुन्हा दाखल करतोस व डंपर कसा काय घेऊन जातो हे पाहतो. त्यामुळे राम यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात शिवदास पाळवदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.