नेरळ ग्रामपंचायतीचा डम्पिंग ग्राउंडवर सतत कचरा जाळण्याचे प्रकार

जाळण्यात येणार्‍या कचर्‍याबद्दल ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांच्याकडून निषेध

By Raigad Times    02-Dec-2022
Total Views |
Neral Dumping
 
कर्जत | नेरळ सारख्या वेगाने नागरीकरण होत असलेल्या शहर वजा गावातील कचर्‍याच्या संकलन केल्या जात असलेल्या मच्छर डेपो मध्ये दररोज कचरा पेटविला जात आहे.त्या ठिकाणी जाळण्यात येत असलेल्या कचरा डेपो मधून बाहेर निघणारे धुराचे लोट यामुळे परिसरातील अनेकांना श्वसनाचे आजार जडू लागले असून त्याबद्दल शेजारच्या कोल्हारे ग्रामपंचायतचे सदस्य विजय हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, प्रशासनाने तेथील धुराचे लोट थांबविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
कर्जत तालुक्यातील नेरळ विकास प्राधिकरण मध्ये रायगड जिल्हा परिषद कडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकारला जात आहे.त्याबद्दल कोल्हारे ग्रामपंचायतचे सदस्य विजय हजारे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले
आहेत. नेरळ गावातून गेल्या काही वर्षात नागरीकरणाच्या प्रवाहात आघाडीवर आहे.त्यात नेरळ गावातून तेथे असलेली रुग्णालये, पॅथेलॉजिकल लॅबोरॅटरी,रासायनिक प्रयोग शाळा तसेच घरगुती ओला-सुका कचरा यांच्यापासून निर्माण होणार कचरा याचा समावेश आहे.या सर्व कचर्‍याची विल्हेवाट लावताना यावर पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत दिलेल्या अधिसूचनांचे कोणत्याही प्रकारे पालन केले जात नसून सरसकट संपूर्ण कचरा जाळला जातो.त्यात नेरळ (माथेरान) व संबंधित संपूर्ण परिसर हा ग्रीन झोन असून सुद्धा नेरळ ग्रामपंचायती मार्फत कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता थेट नित्य-नियमाने सरसकट संपूर्ण कचरा जाळला जात असून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण प्रत्येक दिवशी संद्याकाळी आणि रात्री कचरा जाळून केले जाते असा आरोप करून परिसरातील जनतेला त्या कचरा डेपोमधून निघणार्‍या धुराचा मोठा त्रास होऊ लागला आहे.
 
दररोज रात्री धुरांच्या लोट सुरु असतात त्यावेळी दुर्गंधी देणारे वायू यांचा देखील हवेबरोबर प्रवाह सुरु असतो. त्यामुळे धामोते गाव आणि नवीन वसाहत तसेच कोल्हारे गाव आणि नवीन वसाहत आणि बोपेले गाव तसेच नवीन वसाहत मध्ये राहणारे लोकांची झोप उडाली आहे.त्यामुळे हवेतील प्रदूषण वाढले असून प्रदूषण नियंत्रक मंडळाने याबाबत पुढाकार घेऊन प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रक अधिनियम 1981 अंतर्गत कायदेशीर करावी करावी अशी मागणी विजय हजारे यांनी केली आहे.सदरचा कचरा जाळल्या नंतर इतका प्रचंड विषारी धूर होत असून संपूर्ण परिसराचे वायू प्रदूषण होते आहे आणि त्यानंतर निर्माण होणार्‍या विषारी धुराचा भयंकर त्रास जेष्ठ नागरिक,गर्भवती माता आणि लहान मुले या सर्वाचे आरोग्य धोक्यात आले आहे.नेरळ विकास प्राधिकरण कडून त्याबाबत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु होण्याआधी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी हजारे यांनी केली आहे.त्यात तेथे नव्याने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात असताना कचरा जाळण्याची गरजच का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
 
नेरळ ग्रामपंचायत ने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्व भागांत आणल्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या सर्व कचर्‍यावर प्रक्रिया केली जाईल असे जाहीर केले होते.मात्र त्या ठिकाणी टाकण्यात येत असलेल्या कचर्‍याला दररोज आग लावण्यात येत आहे.आणि त्या आगीमुळे निर्माण होणारा धूर याचा फटका परिसरातील दोन हजार लोकांना आताच बसत आहे.रात्री घरात झोप लागू शकत नाही एवढी दुर्गंधी हवेत येत आहे.त्यात अनेकांना छातीचे दुखणे आणि दम्याचे आजार जडू लागले असून पूर्वी भागात तसेच कोल्हारे ग्रामपंचायत भागातील लोकांचे जगणे मशकील होऊन बसले आहे.
-पप्पू गांधी, स्थानिक रहिवाशी आणि मेडिकल स्टोर चालक