कर्जत तालुक्यातील पेज नदीवर आता रिव्हर राफ्टिंग

साहसी पर्यटकांना उत्तम पर्याय

By Raigad Times    02-Dec-2022
Total Views |
Karajat River
 कर्जत | कर्जत तालुक्यातील बारमाही वाहणार्‍या पेज नदीमध्ये आता होड्यांमधून फिरण्याचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. कर्जत तालुक्यात स्थानिक शेतकरी यांनी सुरू केलेल्या रिसॉर्ट मालक भूमिपुत्र संघटनेच्या वतीने पेज नदीच्या पाच किलोमिटर पात्रात रिव्हर राफ्टिंग चा आनंद साहसी पर्यटकांना घेता येणार आहे.दरम्यान,प्रशिक्षित टीम कडून पेज नदी मध्ये प्रात्यक्षिके झाल्यानंतर रिव्हर राफ्टिंग शुभारंभ झाला आहे.
 
निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या कर्जत तालुक्याची भुरळ अख्या जगाला आहे.त्यात रिव्हर राफ्टिंग हा नदिमधून पर्यटन करण्याच्या साहसी क्रीडा प्रकाराबद्दल देखील आकर्षण आहे.हे लक्षात घेवून कर्जत तालुक्यातील स्थानिक शेतकरी तरूण यांनी आपल्या जमिनीत रिसॉर्ट लहान हॉटेल्स उभारून पर्यटकांना कर्जत तालुक्याचा प्रदूषण मुक्त वातावरणाचा खजिना उपलब्ध करून दिला आहे.एक दोन दिवस प्रदूषणमुक्त निसर्गाच्या सानिध्यात घालवून ताजेतवाने होण्यासाठी अनेक पर्यटक कर्जतला येत असतात. स्थानिक तरुणांनी पर्यटन व्यवसायात प्रगती केली आहे.तालुक्यात येणार्‍या पर्यटकांना उत्तम प्रतीचे जेवण मिळावे आणि प्रदूषण मुख्य निसर्गाच्या सानिध्यात सुट्टीचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी सर्वच सुविधा आपल्या रिसॉर्ट वर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो.येथे आलेल्या पर्यटकांची उत्तम सोय करून त्यांना रीफ्रेश करण्याचा प्रयत्न भूमिपुत्र करीत आहेत.
 
तालुक्यात अनेक पर्यटक यावेत आणि त्या माध्यमांतून किरकोळ व्यवसाय करणार्‍या तरुणाच्या हाताला काम मिळावे याचा प्रयत्न सातत्याने करीत आहेत.कर्जत रिव्हर राफ्टिंगच्या माध्यमांतून पेज नदीवर चालू झालेला लाच किलोमिटर अंतराचा नागमोडी वळणाने पाण्याचे तुषार अंगावर घेत चित्तवेधक थरार यापुढे अनेक पर्यटकांना आकर्षित करील आणि त्या माध्यमांतून भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.कर्जत रिसॉर्ट मालकभूमिपुत्र संघटना यांच्या साह्याने कर्जत येथील पेज नदीवर कर्जत रिव्हर राफ्टिंग चा थरार सुरू झाला आहे. संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील यांनी श्रीफळ वाढवला आणि सर्व सदस्यांनी प्रथम पेज नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग केले.
 
रायगड जिल्ह्यातील भिरा वीज गृह मधून सोडले जाणारे पाणी हे पुढे कुंडलिका मदिमधून पुढे माणगाव तालुक्यात आणि नंतर रोहा तालुक्यातून जात असते.त्या नदीवर रिव्हर राफ्टिंग हा साहसी क्रीडा प्रकार 10वर्षापूर्वी सुरू झाला.त्या ठिकाणी रिव्हर राफ्टिंग करणारे प्रशिक्षित टीमने कर्जत रिव्हर राफ्टिंग टीम कडून कर्जत तालुक्यातील पेज नदी मध्ये रिव्हर राफ्टिंग करण्यासाठी परवानगी घेतली आहे.पाटबंधारे विभाग यांच्या माध्यमातून रिव्हर राफ्टिंग करणारी टीम कर्जत येथे कार्यरत झाली असून सर्व प्रशिक्षित कर्मचारी आणि सुरक्षेची संपूर्ण काळजी घेवून पेज नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग साठी तीन बोटी आणण्यात आल्या आहेत.त्या ठिकाणी साहसी क्रीडा प्रकारात वाहत्या पाण्यात पाण्याचे तुषार अंगावर घेलत एका वेळेस 24 लोक पर्यटन करू शकतात अशी व्यवस्था आहे.त्यासाठी रिव्हर राफ्टिंग करण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांना स्वतःच्या वाहनाने तालुक्यातील भिवपुरी कॅम्प येथील टाटा वीज केंद्र येथे जावे लागणार आहे.शनिवार रविवार पर्यटकांसाठी सकाळ पासून अशी सुविधा आयोजक कर्जत रिसॉर्ट मालक भूमिपुत्र संघटना यांच्याकडून करण्यात येणार आहे.
 
वीकेंडसाठी हजारो पर्यटक कर्जत मध्ये.....
कर्जत हा फार्म हाऊस आणि रिसॉर्ट चा तालुका बनला असून येथे शनिवार आणि रविवार हजारो पर्यटक पर्यटनासाठी येत असतात त्यातील अर्धे पर्यटक माथेरान मध्ये तर अर्धे कर्जत तालुक्यात असलेल्या रिसॉर्ट मध्ये पर्यटनासाठी जात असतात. पर्यटकांची वाढती संख्या मागील काही वर्षात वाढू लागल्याने कर्जत तालुक्यात तब्बल अडीच हजार रिसॉर्ट उभे राहिले आहे.त्यामुळे येणार्‍या पर्यटकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देणार्‍या भूमिपुत्र संघटना यांनी आता रिव्हर राफ्टिंग ची सुविधा सुरू केली आहे.
 
रिव्हर राफ्टिंग...
कर्जत मधील भिवपुरी वीज गृह येथे वीज निर्मिती साठी पुणे जिल्ह्यातील आंद्रा धरणातून पाणी सोडले जाते.त्या धरणातील पाणी खाली आल्यावर पेज नदी मधून पुढे ठाणे जिल्ह्यात जाते.त्या नदी मध्ये बारमाही पाणी असते आणि त्याचा वापर आता रिव्हर राफ्टिंग साठी होणार आहे.पाच किलोमीटर भागात हे रिव्हर राफ्टिंग सुरू झाले आहे.त्यासाठी राफ्टिंग करणार्‍या प्रत्येक पर्यटकाला सेफ्टी जॅकेट यांची देखील व्यवस्था आहे.
 
उदय पाटील -अध्यक्ष कर्जत रिसॉर्ट मालक भूमिपुत्र संघटना
तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपल्या जमिनीत रिसॉर्ट उभे करून पर्यटन केंद्र उभी केली आहेत.त्यासाठी आर्थिक गुंतवणूक केली असून कर्जत तालुक्यात पर्यटकांच मोठा ओघ लक्षात घेता अल्प दरात रिसॉर्ट मध्ये राहण्याची सुविधा मध्यमवर्गीय कुटुंबातील पर्यटक यांच्यासाठी पर्यटनासाठी द्वारे उभी केली आहेत.