शेकाप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीतून हत्या प्रकरणी माटवण येथील 9 जणांना जन्मठेप

30 Nov 2022 14:54:40
murder
 
पोलादपुर । राजकिय वर्चस्ववाद एकाच्या जीवावर बेतला तर 9 जणांचे कुटूंब उध्वदस्त करुन गेला आहे. पोलादपूर तालुक्यातील एका गावात शेकाप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमधील वादातून शिवसेना कार्यकर्त्यांची हत्या झाली होती. या प्रकरणी 9 जणांना माणगाव अति.सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. हे सर्व कार्यकर्ते शेकापचे कार्यकर्ते आहेत.
 
 
तालूक्यातील मौजे माटवण येथील अतुल गणपत मांढरे व मयत गणपत विश्राम मांढरे हे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते होते. तर विठ्ठल कृष्णा म्हस्के, सखाराम विश्राम मांढरे, विकास विठ्ठल म्हस्के, संकेत नारायण म्हस्के, विलास पांडुरंग गोगावले, नाना नथू मांढरे, नाना धोंडू म्हस्के, राजू श्रीपत कालगुडे, कैलास धोंडू नवघरे हे शेकापक्षाचे काम करत होते.
 
 
या दोन्ही पक्षाच्या या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाच्या वर्चस्वावरून वाद होता. त्यामुळे अनेकदा त्यांच्यात भानगडी झाल्या होत्या. याचा राग डोक्यात ठेवून शेकापच्या वरील आरोपींनी शिवसेनेच्या अतुल गणपत मांढरे व त्यांचे वडील गणपत विश्राम मांढरे यांचा काटा काढण्यासाठी कट रचला. दि. 31 मे 2022 रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास मांढरे पिता पुत्र कामावर जात असताना, आरोपींनी त्यांना एका गुरांचे गोठ्याजवळील रोडवर अडवले व जोरदार मारहाण केली.
 
 
लाकडी दांडके व बांबूच्या काठ्यांचे घाव डोक्यावर व कपाळावर पडल्याने गणपत मांढरे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अतुल मांढरे यांनी तक्र्रार दाखल केल्यानंतर पोलादपुर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास स.पोलिस निरिक्षक प्रशांत जाधव, तसेच किरणकुमार सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा उपविभाग रोहा यांनी केला.
 
 
सदर खटल्याची सुनावणी माणगाव अति.सत्र न्यायालय येथे झाली. न्यायालयाने समोर आलेल्या साक्षी पुराव्यानंतर 9 जणांना जन्मठेपीची शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्यामध्ये शासकीय अभियोक्ता जितेंद्र डी. म्हात्रे यांनी फिर्यादी पक्षाच्या वतीने महत्वपूर्ण काम पहिले. सरकार पक्षातर्फे एकुण 12 साक्षीदार तपासण्यात आले. प्रभावी युक्तिवाद करताना सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले 19 न्यायनिर्णय दाखल केले. अ‍ॅड. मोहिनी शेठ यांनीही त्यांना सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0