अलिबाग : धेरंड येथे उभारणार पेपर प्रकल्प

30 Nov 2022 12:39:26
paper project
 
अलिबाग | धेरंड, ता. अलिबाग येथे उभारण्यात येणार्‍या मे. सिनार मास पल्प अँड पेपर प्रा. लि. प्रकल्पाला जागा वाटप देकारपत्र मंगळवारी प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत यांना जागावाटप देकारपत्र प्रदान करण्यात आले.
 
इंडोनेशियामधील सिनार मास पल्प अँड पेपर ही कंपनी राज्यात पहिल्या टप्प्यात अंदाजे 10500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या उद्योगातून सात हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. या कंपनीला पहिल्या टप्प्यासाठी रायगड जिल्ह्यातील धेरंड येथे 287 हेक्टर जमिनीचे वाटप पत्र आज प्रदान करण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे सीईओ विपीन शर्मा, सिनार मास पल्प अँड पेपर प्रा. लि. कंपनीचे संचालक सुरेश किल्लम, कंपनीचे भारतातील प्रमुख सिद्धार्थ फोगट आदी मान्यवर उपस्थित होते.
 
रायगड जिल्ह्यात सिनार मास पल्प या कागदनिर्मितीच्या 20 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या उद्योगासह अन्य उद्योग प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली. अलिबाग तालुक्यातील धेरंड येथे या प्रकल्पासाठी यापूर्वीच 300 एकर जागा देण्यात आली असून, प्रकल्पाच्या मागणीनुसार अधिकची जागा देण्याचा शासनाचा मानस आहे. प्रकल्पस्थळ आणि परिसरात मोठया प्रमाणावर वाढणारे उद्योग आणि होणारी रोजगारनिर्मिती लक्षात घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीने प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 
सिनार मास पल्प या कागद प्रकल्पातून टिश्यू, पॅकेजिंगच्या कागदाची निर्मिती केली जाणार आहे. या पेपरना जगभरात 150 देशांमध्ये मागणी आहे. इंडोनेशियास्थित सिनार्मस कंपनी आणि आशिया पेपर यांच्या संयुक्त भागिदारीतून हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0