कपिल देव यांना कर्जतची क्रेझ, 25 एकर जागा केली खरेदी

By Raigad Times    29-Nov-2022
Total Views |
kapil dev
 
 
 
कर्जत । 1990च्या दशकात उदयास येऊ लागलेली शेतघराची क्रेझ आज कर्जत तालुक्याला जगाच्या पाठीवर नेऊन ठेवणारी आणि कर्जत या नावात असलेली जादू यामुळे फार्म हाऊस म्हटले की कर्जत असे सहज उदगार येतात. त्या कर्जतमध्ये आपला देखील टुमदार बंगला असावा अशी फर्माईश धनिकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, या संधीचा फायदा उठविण्यासाठी कर्जतचा एकही कोपरा बांधकाम व्यावसायिकांनी शिल्लक ठेवला नाही आणि त्यामुळे कर्जतचे प्रेम सर्वांना असून त्याचाच एक भाग आता भारताला क्रिकेट विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार कपिल देव निखंज यांनी कर्जत मध्ये जमीन खरेदी केली आहे.
1985 च्या काळात मुंबई मधील धनिकांना कर्जतच्या प्रदूषण मुक्त झाडीने आकर्षित केले. त्यावेळी शेतकर्‍यांकडून माळरान असलेली जमीन विकत घेतली आणि तेथे शेतघरे बांधली. पुढे या शेतघर असलेल्या शेतकरी धनिकांनी आपल्या शेतघराला फार्महाऊस असे नाव दिले आणि फार्म हाऊस संस्कृतीचा जन्म झाला. त्याच काळात राज्यात शिवसेना-भाजपचे शिवशाही सरकार सत्तेवर होते आणि त्या वेळी रिमोट कंट्रोलची भूमिका वठविणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कर्जत येथील फार्म हाऊस मध्ये असलेला वावर यामुळे फार्म हाऊस ही नवीन ओळख निर्माण झाली. बाळासाहेब विश्रांती साठी कर्जतच्या फार्म हाऊसवर पोहचले की राजकीय वर्तुळात बातमी व्हायची,त्यामुले खर्‍या अर्थाने त्यांच्यामुळे फार्महाऊस संस्कृतीला वलय निर्माण झाले.
आज कर्जत तालुक्यात असलेल्या फार्म हाऊस मध्ये साहित्य, कला, क्रीडा,अर्थ जगत शिक्षण या सर्व क्षेत्रातील लोकांचे फार्म हाऊस आहेत, त्यात राजकीय नेत्यांच्या असलेल्या टुमदार बंगल्यांमुळे कर्जत अधिक ठळकपणे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.कर्जत म्हटले की फार्म हाऊस आणि हेच फार्म हाऊस कर्जत तालुक्यातील जनतेच्या जीवनांतील अविभाज्य घटक बनले आहे.
 
कर्जत तालुका पर्यटन तालुका बनलेला असताना या तालुक्यातील प्रदूषण मुक्त वातावरण सोबत बारमाही वाहणार्‍या नद्या आणि बंगलो संस्कृती यामुळे कर्जत तालुक्याला वेगळे वलय आहे.त्यात देशातील सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मान्यवरांचे फार्म हाऊसेसने कर्जत नटले आहे. त्यात आता आघाडीचा क्रिकेटर आणि आपल्या देशाला क्रिकेट मधील पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारा कपिल देव हे देखील कर्जतच्या प्रेर्मात पडले आहेत. त्यांनी तालुक्यातील कोठिंबे भागात जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीचे दस्त कपिल देव यांच्याकडून नेरळ येथील सह निबंधक कार्यालयात नोंदविण्यात आले.
 
त्या जागेचे दस्त कर्जत बार असोसिएशनचे वकील अँड भूपेश पेमारे यांच्याकडून केले जाणार होते आणि त्यांनी त्या दस्ताची नोंद करण्यासाठी कसोटीपटू क्रिकेटर कपिल देव येणार असल्याची माहिती दिली होती.त्याबद्दल माहिती सर्वांना झाली तर सन्मान हॉटेल परिसरात असलेल्या उप निबंधक कार्यालयात गर्दी होईल याची कल्पना सह निबंधक महेंद्र भगत यांना असल्याने त्यांनी आणि अँड पेमारे यांनी पूर्ण गुप्तता पाळली होती.दुपारी ब्लॅक रंगाची गाडी नेरळ येथे सह निबंधक कार्यालयाबाहेर उभी होती,त्यामुळे त्या गाडीतून कोणी व्हीआयपी येणार अशी शक्यता वर्तवली जात होती.
 
मात्र सह निबंधक कार्यालयातून पूर्णपणे गुप्तता पाळली असताना देखील ज्यावेळी कपिल देव यांच्या दस्ताचा नंबर आला त्यावेळी कपिल देव आपल्या आलिशान गाडी मधून बाहेर आले आणि एकच गलका त्यांच्याभोवती झाला. तब्बल 15 मिनिटे कपिल देव यांना स्थानिक तसेच त्यांच्या चाहत्यांच्या गलक्यातून बाहेर पडून कार्यालयात पोहचायला लागले.सह निबंधक कार्यलयात पोहचल्यानंतर उप निबंधक महेंद्र भगत यांनी त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले. त्यावेळी त्यांचे वकील अँड भूपेश पेमारे तसेच कार्यालयीन स्टाफ सुनील लगड, मंगेश तिठे, कुणाल दळवी, सारिका गायकेवड, विद्या जाधव यांनी सर्वननी फोटो काढून घेतले. तर कार्यालयात उपस्थित अनेक वकिलांना देखील कपिल देव सोबत सेल्फी काढण्याचा मोह आवारात आला नाही. तर जेमतेम 15 मिनिटात दस्त नोंदवून कपिल देव सह निबंधक कार्यालयातून बाहेर पडले त्यावेळी शेकडो चाहते बाहेर उभे होते. स्थानिक रिक्षाचालक यांनी देखील कपिल देव यांची छबी आपल्या मोबाईल मध्ये टिपली.
  • जमीन...
कोठिंबे येथे 25 एकर जमीन खरेदी केली असल्याची माहिती मिळत असून त्यासाठी काही लाखात स्टॅम्प ड्युटी पोटी भरली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र देशातील अन्य क्रिकेटरप्रमाणे कपिल देव देखील कर्जत तालुक्याचे रहिवाशी बनणार आहेत.