मुंबई । अलिबागकरांना आता नवी मुंबईला केवळ सव्वातासात पोहचता येणार आहे. बेलापूर-मांडवा वॉटर टॅक्सी (लाँच) सेवा शनिवार दि 26 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. यासाठी प्रवाशांना तिकिटापोटी 300 आणि 400 रुपये मोजावे लागणार आहेत. ही सेवा सुरुवातीला केवळ शनिवार आणि रविवारसाठीच असणार आहे.
नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून 200 प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सेवेत दाखल झाली. ही वॉटर टॅक्सी अन्य मार्गांवरही चालवण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला असून ही सेवा बेलापूर-गेट वे ऑफ इंडिया दरम्यान सुरू करण्यात येणार आहे. बेलापूर - गेट वे ऑफ दरम्यान वॉटर टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दुसरीकडे सागरी मंडळाने बेलापूर-मांडवा मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार, 26 नोव्हेंबरपासून या मार्गावर वॉटर टॅक्सी धावणार असल्याची माहिती नयनतारा कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली. बेलापूर जेट्टी येथून सकाळी 8 वाजता ही वॉटर टॅक्सी निघणार असून सकाळी 9.15 वाजता मांडव्याला पोहचेल. तर संध्याकाळी 6 वाजता मांडव्यावरून वॉटर टॅक्सी निघेल आणि रात्री 7.45 वाजता बेलापूरला पोहचेल.
ही वॉटर टॅक्सी केवळ शनिवार आणि रविवार अशा सुट्टीच्या दिवशीच धावणार आहे. यासाठी 300 आणि 400 रुपये असे तिकीट असणार आहे. सध्या नवी मुंबईतून अलिबागला पोहचण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. पण या वॉटर टॅक्सीमुळे बेलापूर - मांडवा अंतर केवळ सव्वातासात पार करता येणार आहे.
दरम्यान, या सेवेसाठीच्या ऑनलाइन बुकिंगला बुधवारी सकाळपासून सुरुवात झाली आहे.