शाब्दिक बाचाबाची तून आरोपीने केला पोलिसांवर हल्ला

22 Nov 2022 14:26:37
fight
 
पनवेल : न्यायालयाने आरोपीला खटल्याची ८ डिसेंबर ही पुढील तारीख दिली. मात्र त्या संशयिताला पोलिसांच्या ताब्यात न राहता घरी जायचे होते. अखेर वैतागलेल्या आरोपीने पोलिसालाच मारहाण केली. याबाबत गुन्हा नोंद झाला आहे. पनवेल येथील न्यायालयात ही घटना घडली.
 
४२ वर्षीय संतोष पाटील हा संशयित आरोपी घेऊन पोलीस कर्मचारी ओंकार ठाकरे हे पनवेल न्यायालयात आले होते. पुढील तारीख ८ डिसेंबर देण्यात आली. त्यानंतर पोलीस संतोषला घेऊन जात असताना संतोष पाटील याने तळोजा कारागृहात जाण्यापेक्षा त्याला घरी पाठवावे असा हट्ट पोलिसांसमोर केला. शाब्दिक बाचाबाची झाली. संतोषने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांचा गणवेश सुद्धा फाडण्याचा प्रयत्न संतोषने केला.
 
पोलिसाला जखमी केल्याने संतोषवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी संतोष याला करोनाकाळात पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. कोरोना संसर्गामुळे संतोषला त्याच्या पत्नीने विलगीकरणात ठेवले होते. त्यावरून संतापाच्या भरात त्याने हत्या केली होती.
Powered By Sangraha 9.0