कर्जत : मलेशिया देशाची राजधानी असताना क्वालालंपूर इथे झालेल्या मिस हेरिटेज इंटरनॅशनल स्पर्धेत माथेरानच्या हर्षा विनोद शिंदे हिने भारताचे प्रतिनिधित्व करीत मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत तिने मिस हेरिटेज इंटरनॅशनलचा किताब जिंकत नावलौकिकी मिळविला आहे. ३० पेक्षा जास्त देशांच्या वतीने प्रतिनिधींनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.
बेस्ट पर्सनॅलिटी, मिस हेरिटेज इंडिया अशा स्पर्धा जिंकत तिने मिस हेरिटेज इंटरनॅशनलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत हा किताबसुद्धा आपल्या नावी केला आहे. यामुळे तिला माथेरान मधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आई रेश्मा मोरे-शिंदे आणि वडील विनोद शिंदे हे दोघेही माथेरान मधील असून एक छोटासा हॉटेल व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे.
मुलीला लहानपणापासून मॉडेलिंगची आवड. ही आवड जोपासत तिला प्रोत्साहन देत आणण्यात यांचा खूप मोठा हात आहे. त्यामुळे या यशाबद्दल आई वडिलांच्या तितकाच वाटा आहे असे हर्षा हिने सांगितले. हर्षा ही भरतनाट्यममध्ये पारंगत असून तिला लेखनाची आवड आहे. निसर्गचित्र, व्यक्तिचित्र तसेच वस्तू चित्र काढण्यात तिला स्वारस्य आहे. सध्या ती लंडन येथील प्रसिद्ध हार्टफोर्डशायर युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर इन आर्किटेक्ट अँड डिझायनिंगचे शिक्षण घेत आहे.