श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी गावात एका परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

सहा आरोपी विरोधात गुन्हा दाखल

By Raigad Times    11-Nov-2022
Total Views |
file photo
श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी गावामध्ये एक परप्रांतीय कुटुंब राहत होते. यामधील एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार होण्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदर पीडित मुलीचे कुटुंब वाळवटी येथील एका चाळीमध्ये राहत होते. याच चाळीमध्ये राहणाऱ्या एका स्त्रीने सदर मुलीला तुला कामासाठी बाहेरगावी घेऊन जाते, अशी फूस लावून श्रीवर्धन या ठिकाणाहून माणगाव या ठिकाणी घेऊन गेली. सदर स्त्रीने तिला माणगाव येथे आपल्या बहिणीच्या घरी पाच सहा दिवस ठेवून घेतले. सदर मुलगी 24 ऑक्टोबर रोजी वाळवटी गावातून बेपत्ता झाली होती.
 
याबाबत मुलीच्या आई वडिलांनी दिनांक 30 ऑक्टोबर रोजी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणी श्रीवर्धन पोलिसांनी मनुष्य मिसिंग रजिस्टर 144/2022 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. दरम्यानच्या काळामध्ये सदर पीडित मुलीच्या आई-वडिलांनी नालासोपारा येथे राहणाऱ्या आपल्या भावाच्या घरी देखील जाऊन चौकशी केली होती.
परंतु पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये सदरची मुलगी एका रिक्षामध्ये बसून कुठेतरी गेल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी सदर रिक्षावाल्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. रिक्षावाल्याने अगोदर उडवा उडवीची उत्तरे दिली, परंतु नंतर सदर पीडित मुलगी व एका स्त्रीला आपण माणगाव येथे सोडल्याचे कबूल केले.
 
यानंतर पोलिसांनी माणगाव येथे जाऊन चौकशी केली असता वाळवटी येथील पीडित मुलीच्या शेजारी राहणारी स्त्री व माणगाव येथे राहणारी तिची बहीण या दोघींनी सदर मुलीला नालासोपारा येथे नेऊन आपल्या छोट्या भावाजवळ जबरदस्ती लग्न लावल्याचे निष्पन्न झाले.
 
परंतु सदरची मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी चार महिला व दोन पुरुष आरोपींवरती गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व बालविवाह प्रतिबंधक कायदा या अन्वये गुन्हा दाखल केलेला असून पोलिसांनी सदर आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली होती. परंतु काल पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. सदरचे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण अतिशय गंभीर असून आरोपींवरती कडक कारवाई व शिक्षा करण्यात यावी. अशी मागणी सामान्य जनतेमधून केली जात आहे.