राज्यात आता तिसरीनंतर ढकलगाडी बंद? तिसरीपासून पुन्हा परीक्षा होण्याची शक्यता

By Raigad Times    07-Oct-2022
Total Views |
pen school
 
पुणे | राज्यात तिसरीपासून पुन्हा परीक्षा होणार असल्याचे संकेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जात होते. ती ढकलगाडी आता बंद होण्याची शक्यता आहे.
 
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची राज्यातील शिक्षण तज्ज्ञांशी यासंदर्भात चर्चा सुरु आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आठवी पर्यंत पास केलं जात होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. त्यामुळे शिक्षण तज्ज्ञांबरोबर चर्चा करुन शिक्षण हक्क कायद्यात काही बदल केले जाऊ शकतात का विषयी चर्चा सुरु आहे. त्यानुसार तिसरीपासून परीक्षा घेण्याचा सूतोवाच केला जात आहे.
 
परिक्षा घेतली तरी आम्ही मुलांना अनुतिर्ण करणार असा त्याचा अर्थ काढण्यात येऊ नये. हा निर्णय केवळ चर्चेच्या पातळीवर असून या संदर्भात शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच अंतीम निर्णय घेतला जाईल असंही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.