कर्जत रेल्वे स्थानकात नवीन रेल्वे लाईनसाठी पादचारी पुलाचा काही भाग पाडला

07 Oct 2022 15:31:07
karjat railway
 
कर्जत | - कर्जत रेल्वे स्थानकात काही वर्षांपूर्वी बांधलेला कमी उंचीचा असलेला पादचारी पुल काही तांत्रिक कामानिमित्त पाडून त्याजागेवर थोडा उंच व रुंद असा पादचारी पूल दहा-बारा वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. त्या पुलाचा काही भाग कर्जत - पनवेल नवीन रेल्वे लाईन टाकण्यासाठी पाडण्यात आला.
 
कर्जत रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे वरील महत्वाचे स्थानक आहे. मुंबईहून पुण्याला जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गाडया येथे डबल इंजिन लावण्यासाठी थांबत असतात. आता कर्जत-पनवेल साठी नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे. सुरुवातीपासून कर्जत रेल्वे स्थानकात जुना पादचारी पूल होता. मध्यंतरीच्या काळात डी सी, ए सी च्या तांत्रिक कामामुळे तो पूल पाडण्यात आला व त्याच जागेवर उंच व रुंद असा पूल उभारण्यात आला होता. हा पूल भिसेगाव कडील जुन्या एसटी स्टँडच्या बाजूला उतरविण्यात आला होता.
 
या पुलामुळे कर्जत-पनवेल साठी नवीन रेल्वे लाईन टाकण्याच्या कामी अडचण येत होती. म्हणून जुन्या एस टी स्टँड कडे उतरविण्यात आलेला. फलाट क्रमांक तीन वरील भाग काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी या पुलाला जोडून एक नवीन पूल बांधून दक्षिणेकडून पश्चिमेकडे उतरवण्यात आला आहे. त्यामुळे आज सकाळी अकरा ते दोन या दरम्यान ब्लॉक घेऊन तो अडचणीचा ठरणारा भाग तोडण्यात येणार होता. त्यासाठी पहाटेच्या सुमारासच एक मोठी क्रेन पूला जवळ आणण्यात आली होती.
 
पूल तोडण्याचे काम अकरा ते एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत चालले. यावेळी सुमारे सतरा कर्मचार्‍यांनी हे काम केले. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अनिल वर्मा आपल्या जवनांसह घटनास्थळी सकाळी साडे नऊ वाजल्यापासून उपस्थित होते. पादचारी पुलाचा अडचणीचा भाग पडल्याने आता नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू होईल.
Powered By Sangraha 9.0