राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे यांचा राजीनामा; उद्या शेकापमध्ये करणार प्रवेश

वेश्वी विकास महाआघाडीला धक्का

By Raigad Times    06-Oct-2022
Total Views |
Datta Dhavle
 
अलिबाग । अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता ढवळे यांनी सदस्यपदाचाही राजीनामा दिला आहे. ते शनिवारी शेकापमध्ये प्रवेश करणार असून त्यांच्या पक्षप्रवेश जंगी सोहळा आयोजित केला जाणार असल्याचे शेकापकडून सांगण्यात आले आहे. वेश्वी ग्रामपंचायतीच्या पार्श्वभुमिवर हा निर्णय त्यांनी घेतल्यामुळे विकास महाआघाडीला धक्का बसणार आहे.
 
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते राष्ट्रवादीत कार्यरत होते. या काळात त्यांनी चेंढरे ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदीही भूषविले होते. राष्ट्रवादीत झालेल्या अनेक भरती ओहटी त्यांनी पाहिली आहे. मात्र ते राष्ट्रवादीसोबत ठाम राहीले. खा. सुनिल तटकरे यांच्यावर त्यांचा मोठा विश्वास. त्यांच्यामुळेच गेली अडीच वर्षे ते तालुकाध्यक्ष म्हणूनही काम करीत होते.
 
अलिबाग तालुकाध्यक्ष पद सांभाळणार्‍यांमध्ये चांगले काम करणारा कार्यकर्ता म्हणून वाहवा मिळवली. उसणेवारी करुन पक्षाचे विविध कार्यक्रम राबवले. मात्र म्हणावी तशी साथ त्यांना पक्षाकडून लाभत नव्हती. खा. सुनिल तटकरे यांना सोडून जाणे माझ्यासाठी दुखाची बाब नक्कीच आहे. परंतू पक्षासाठी काम करतानाही पक्षातील काही लोक राजकारण करत असतील तर माझ्यासमोर पर्याय राहीला नाही असे ढवळे यांनी म्हटले आहे.
 
दरम्यान, दत्ता ढवळे हे याआधी अनेकवेळा शेकापमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र ते राष्ट्रवादीसोबत कायम राहीले. आता मात्र राष्ट्रवादीला रामराम ठोकत शेकापमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यात वेश्वी ग्रामपंचायतीमध्ये आघाडीचा समा ढवळे यांनीच बांधला घेतला. मात्र एैन निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच दत्ता ढवळे यांनी शेकापमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे विकास महाआघाडीला धक्का बसणार आहे.
 
 
  • राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असताना तालुक्यातील पक्षाच्या काही पदाधिकार्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्याने आपण शेतकरी कामगार पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय आपण यापूर्वीच तालुकाध्यक्ष पदाबरोबरच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिलेला आहे.
          - दत्ता ढवळे, माजी उपसरपंच,चेंढरे