काय ती एन्ट्री, काय ती स्टाईल...पालीत राज ठाकरेंना पाहून चाहते बेहद्द खुश

लाडक्या नेत्याचे मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत; चाहत्यांची गर्दी

By Raigad Times    04-Oct-2022
Total Views |
Raj T
 
पाली/बेणसे । रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेल्या कोंडजाई देवीचे मंदिर आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवरात्रोत्सवात मंगळवारी दि.(04) सपत्नीक कोंडजाई देवीची खण नारळाने वटी भरून मनोभावे आरती व पूजा केली.
 
सलग दोन वर्षे कोरोनाच्या महामारीत शासन निर्बंध असल्याने राज ठाकरे व कुटुंबीयांना नवरात्रोत्सवात येऊन प्रत्येक्ष दर्शन घेता आले नव्हते. राज ठाकरे दरवर्षी आपल्या कुटुंबीयांसह सुधागड तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात हिरवळीने दाटलेल्या व कड्याकपारीत वसलेल्या नागशेत विभागातील श्री कोंडजाई देवीची मनोभावे पूजा करून दर्शन घेतात.
 
राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे पालीत अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पाली यांच्या वतीने राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर, आक्रमक व शिस्तप्रिय नेते आहेत, त्यांच्या खास शैलीतील, ओघवत्या वाणीतील प्रभावशाली भाषणांचे सर्वांना आकर्षण असते. त्यांच्या स्टाइलचे चाहते सबंध महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पहावयास मिळतात. त्यामुळे राज ठाकरे पालित येणार म्हटले की मनसे कार्यकर्ते पदाधिकार्‍यांसह चाहते देखील त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात. असेच चित्र यावेळी देखील पहावयास मिळाले.
 Raj T2
 
 
बल्लाळेश्वर मंदिर परिसरात राज ठाकरे यांना जवळून पाहण्यासाठी भेटण्यासाठी, बोलण्यासाठी तरुण तरुणी आबाल वृद्ध व चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती. काय ती एन्ट्री, काय ती स्टाईल, पालीत राज ठाकरेंना पाहून चाहते बेहद्द खुश झाल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले. पालित राज ठाकरे यांचे गगनभेदी घोषणा, फटाक्यांची आतिषबाजी व ओवाळणीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जूनला असतो, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कृष्णकुंज वर हजारो कार्यकर्ते जात असतात, मात्र यावर्षी त्यांची शस्त्रक्रिया असल्याने त्यांनी वाढदिवशी कार्यकर्त्यांना भेटायला घरी येऊ नका, आहात तिथून शुभेच्छा द्या, असे ट्विट द्वारे आवाहन केले होते, त्यामुळे आता जिल्ह्यातील कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्याच्या भेटीसाठी स्वागतासाठी प्रचंड आतुरले होते, सार्‍यांना साहेबांच्या भेटीची ओढ लागली होती.
 
काही झाले तरी साहेब नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी पाली सुधागडात येणार, आपल्याला भेटणार ही खात्री कार्यकर्त्यांना असल्याने पाली सुधागड सह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने पालित आले होते. राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर पाली खोपोली राज्यमहामार्गावर पाली फाटा, परळी, जाम्भूळपाडा, पेडली, पाली वाकण व ठिकठिकाणी मोक्याच्या जागेवर, नाक्यानाक्यावर झळकत होते. दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे यांच्या समवेत एखादी सेल्फी क्लिक व्हावी यासाठी चाहत्यांनी इच्छा व्यक्त केली व राज ठाकरे यांनी ती पूर्णही केल्याचे दिसून आले.
 
राज ठाकरे हे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह कोंडजाई देवी परिसरातील निसर्गरम्य वातावरणात काही काळ रमून गेले, घनदाट वृक्षवल्ली , मनमोहक हिरवळ , पांढरे शुभ्र खळखळणारे नदी व झर्‍यांचे निखळ पाणी पाहून ते दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यातही पुढाकार घेतला, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील येथील निवांत क्षण त्यांनी अनुभवले. कार्यकर्त्यांशी मनमोकळेपणे व आपुलकीने संवाद देखील साधला. दरम्यान हा राजकीय दौरा नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्या समवेत मनसे नेते बाळा नांदगावकर, शोभा देशपांडे, सचिन मोरे, गोवर्धनभाई पोलसानी, मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, मनसे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड, मनसे महिला जिल्हा सचिव लताताई कळंबे, सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे, सुधागड तालुका महिला अध्यक्ष संजीवनी अजय अधिकारी, हरीचंद्र तेलंगे, संदीप ठाकुर, रूपेश पाटिल, पवित्र पोलसानी, साईनाथ धुळे, दिपश्री घासे, अजय अधिकारी, भावेश बेलोसे, सचिन झुन्जारराव आदींसह पदाधिकारी, मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.